पुणे | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मध्ये गुरुवारी 19 ऑक्टोबर रोजी टीम इंडिया विरुद्ध बांगलादेश यांच्यात सामना होणार आहे. या सामन्याला दुपारी 2 वाजता पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये सुरुवात होणार आहे. त्याआधी 1 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणार आहे. बांगलादेश या निमित्ताने टीम इंडिया विरुद्ध भारतात तब्बल 25 वर्षांनी वनडे सामना खेळणार आहे. बांगलादेशने याआधी टीम इंडिया विरुद्ध भारतातील अखेरचा सामना हा 1998 साली खेळला होता. त्यामुळे बांगलादेशसाठी हा सामना महत्त्वाचा आहे. टीम इंडियाने या स्पर्धेत आतापर्यंत सलग 3 सामने जिंकले आहेत. तर बांगलादेशने 3 पैकी 2 सामने गमावून एक जिंकला आहे. पुण्यात गुरुवारी हवामान कसं असेल हे आपण जाणून घेऊयात.
पुण्यात बुधवारी संध्याकाळी पावसाने हजेरी लावली. टीम इंडिया आणि बांगलादेश दोन्ही संघांचा सराव सुरु होता. या दरम्यान रिमझिम पाऊस सुरु झाला. त्यामुळे ग्राउंड्स स्टाफने चपळाईने मुख्य खेळपट्टी कव्हर्सन झाकली. त्यामुळे गुरुवारी सामन्यादरम्यान पाऊस खेळ बिघडवणार का, अशी भीती क्रिकेट चाहत्यांना सतावतेय. सामन्यादरम्यान किती टक्के पाऊस होण्याची शक्यता आहे समजून घेऊयात.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी ढग दाटलेले असतील. सामन्याच्या दिवशी हवामान स्वच्छ असेल. गुरुवारी दिवशी उन असेल. त्यामुळे पावसामुळे सामन्यावर तसा काही परिणाम होणार नाही, अशी आशा व्यक्त केली जात आहे. आता सामन्यादरम्यान काय होतं, हे तेव्हाच समजेल.
आयसीसी वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), हार्दिक पांड्या (उपकर्णधार ), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, इशान किशन, सूर्यकुमार यादव. रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव आणि मोहम्मद शमी.
बांगलादेश टीम | शकिब अल हसन (कॅप्टन), लिटॉन कुमेर दास, तन्झिद हसन तमीम, नजमुल हुसेन शांतो (विकेटकीपर), तौहीद हृदोय, मुशफिकुर रहीम, महमुदुल्लाह रियाद, मेहिदी हसन मिराझ, नसुम अहमद, शाक महेदी हसन, तस्किन रहमान, मुस्तफीर रहमान , हसन महमूद , शोरीफुल इस्लाम आणि तनझिम हसन साकीब.