भारताने बांगलादेशला दुसऱ्या टी20 सामन्यात 86 धावांनी पराभवाचं पाणी पाजलं. भारताने प्रथम फलंदाजी करतना 222 धावांचं लक्ष्य बांगलादेशसमोर ठेवलं होतं. या धावांचा पाठलाग करताना बांगलादेशचा संघ गडगडला. बांगलादेशने 46 धावांवर 4 विकेट गमावले होते. त्यानंतर महमुदुल्लाह आणि मेहदी हसन मिराजने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे कर्णधार सूर्यकुमार यादवने विकेटसाठी रियान परागच्या हाती चेंडू सोपवला. पण यावेळी रियान परागची विचित्र गोलंदाजी शैली पाहायला मिळाली. रियान परागने लसिथ मलिंगाच्या स्टाईलने चेंडू फेकला. पण पंचांनी हा चेंडू नो असल्याचं जाहीर केलं. पंचांनी हा चेंडू नो असल्याचं जाहीर करताच चर्चांना उधाण आलं आहे. रियान परागचा हा चेंडू नो देण्याचं कारण काय? असे एक ना अनेक प्रश्न समोर येत आहेत.
बांगलादेशचे विकेट झटपट बाद करण्यासाठी सूर्यकुमार यादव एक एक करत गोलंदाज वापरत होता. 11 वं षटक टाकण्यासाठी त्याने अष्टपैलू रियान परागच्या हाती चेंडू सोपवला. पण महमुदुल्लाहने पहिल्याच चेंडूवर उत्तुंग षटकार ठोकला. पहिल्याच चेंडूवर षटकार आल्याने लगेचच रियान परागने शैलीच बदलली. तसा प्रयत्न करत असताना चौथा चेंडू टाकताना चूक झाली. वाइड ऑफ द क्रीज जाऊन चेंडू टाकल्याने पाय क्रिजच्या बाहेर गेला. त्यामुळे पंचांनी तात्काळ नो बॉल दिला. अशा पद्धतीने नो बॉल असल्याचा खरं तर हा दुर्मिळ प्रकार आहे. कारण अनेकदा गोलंदाज गोलंदाजी करताना पुढची लाईन ओलांडतो. साइड लाईन ओलांडण्याचा प्रकार क्वचितच पाहायला मिळतो.
What was that Riyan Parag ? 🤣🤣#INDvsBAN pic.twitter.com/qBxWsFgeyI
— VIGHNESH🔴 (@vigz__manutd) October 9, 2024
पंचांनी नो बॉल देताच रियानला आश्चर्याचा धक्का बसला. कारण अशा पद्धतीने चेंडू टाकण्यासाठी रियान सरावही करताना पाहिल्याचं समालोचकांनी सांगितलं. सराव शिबिरातील एक व्हिडीओ समोर आला होता. त्यात अशा पद्धतीने चेंडू टाकण्याचा प्रयत्न करत होता. पण त्याला या नियमाबाबत माहिती नसावं. त्यामुळे तो अशा पद्धतीने चेंडू टाकण्याचा प्रयत्नात होता.
एमसीसीच्या 21.5 नियमानुसार, गोलंदाजाच्या पुढच्या पायाचा काही भाग लाईनवर असायला हवा. मागचा पाय क्रीजच्या बाजूच्या ओळीच्या आत असायला हवा. रिटर्न क्रीजला स्पर्श करण्याची देखील परवानगी नाही. असे न झाल्यास पंच नो बॉल देऊ शकतात. गोलंदाजी करताना रियान परागने केवळ साईड लाईनच ओलांडली नाही तर तो खेळपट्टीच्या बाहेरही गेला. त्यामुळे नो बॉल देण्यात आला.