टीम इंडिया बांगलादेश विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी सज्ज आहे. टीम इंडिया रोहित शर्मा याच्या नेतृत्वात 19 सप्टेंबरपासून 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. सलामीचा सामना हा चेन्नईतील एम ए चिदंबरम स्टेडियममध्ये होणार आहे. बीसीसीआयने 8 सप्टेंबर रोजी पहिल्या सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली. टीम इंडियात ऋषभ पंतचं 20 महिन्यांनी भारतीय संघात पुनरागमन झालं आहे. तर जसप्रीत बुमराह सुद्धा खेळणार आहे. यश दयाल याची पहिल्यांदाच निवड करण्यात आली आहे. तर काही खेळाडूंना संधी मिळाली नाही. मात्र ध्रुव जुरेल, सरफराज खान आणि इतर काही खेळाडू आपली जागा कायम राखण्यात यशस्वी ठरले.
टीम इंडियाच्या घोषणेनंतर आता बीसीसीआयने 21 वर्षीय ऑफ स्पिनरला टीम इंडियाच्या शिबीरात सहभागी होण्यासाठी आमंत्रित केलं आहे. या 21 वर्षीय खेळाडूचं नाव हे हिमांशु सिंह असं आहे. हिमांशुने अंडर 16 आणि अंडर 23 स्पर्धांमध्ये मुंबईचं प्रतिनिधित्व केलं आहे. टीम इंडिया 13 ते 18 सप्टेंबर दरम्यान पहिल्या सामन्याआधी शिबीरात कसून सराव करणार आहे. हिमांशुची बॉलिंग एक्शन ही आर अश्विन याच्यासारखी आहे. भारतीय फलंदाजांचा स्पिन बॉलिंगविरुद्ध सराव व्हावा, या उद्देशाने हिमांशुला या शिबीरात समाविष्ठ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
हिमांशुने अनंतपूर आणि बंगळुरुत बीसीसीआयच्या ‘एमर्जिंग प्लेअर्स’ कॅम्पमध्ये सहभागी झाला होता. हिमांशुने आपल्या बॉलिंगने बीसीसीआय निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर यांनाही प्रभावित केलंय. त्यामुळेच हिमांशुला संधी दिली गेली आहे. हिमांशुने काही दिवसांपूर्वी आंध्रप्रदेश विरूद्धच्या सामन्यात 74 धावांच्या मोबदल्यात 7 विकेट्स घेतल्या होत्या. हिमांशुला अद्याप मुंबईच्या सिनिअर टीममध्ये स्थान मिळालेलं नाही. मात्र त्याने आपल्या कामगिरीच्या जोरावर टीम इंडियाच्या सराव शिबीरात सहभागी होण्याचा मान मिळवला आहे.
हिमांशू सिंहची अश्विन स्टाईल बॉलिंग
बांगलादेश विरूद्धच्या पहिल्या कसोटीसाठी भारतीय संघ : रोहित शर्मा (कॅप्टन), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सरफराज खान, ऋषभ पंत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह आणि यश दयाल.