भारत आणि बांग्लादेश यांच्यात 19 सप्टेंबरपासून कसोटी मालिका सुरु होणार आहे. या मालिकेसाठी दोन्ही संघ सज्ज असून भारताची प्लेइंग 11 कशी असेल याकडे लक्ष लागून आहे. पहिल्या कसोटी सामन्यापू्र्वीच कर्णधार रोहित शर्माने सांगितलं की, भारतीय प्रत्येक सामना जिंकू इच्छित आहे. बांगलादेशविरुद्धचा कसोटी सामन्यासाठी पूर्णपणे सज्ज असल्याचं त्याने सांगितलं आहे. देशासाठी सामने खेळत असून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये गुण मिळवणं हाच हेतू आहे, असंही कर्णधार रोहित शर्मा म्हणाला. दुसरीकडे, कर्णधार रोहित शर्माने केएल राहुल याची पाठराखण केली. त्याला संघात स्थान का मिळालं याचंही स्पष्टीकरण दिलं आहे. केएल राहुल गेल्या अनेक वर्षांपासून कसोटी क्रिकेट खेळत आहे. विदेशी भूमीवर त्याने शतकी खेळीही केली आहे. पण त्याच्या कामगिरीत सातत्य नसल्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. त्यामुळे त्याच्या निवडीवरून चर्चांना उधाण आलं होतं. अखेर कर्णधार रोहित शर्माने स्पष्टपणे सांगितलं आहे.
कर्णधार रोहित शर्माने सांगितलं की, ‘केएल राहुल एक दर्जेदार फलंदाज आहे. त्याच्यात जबरदस्त टॅलेंट आहे. केएल राहुलने संघात पुनरागमन केलं आहे. त्याने दक्षिण अफ्रिकेत शतक ठोकलं आहे. हैदराबादमध्ये त्याने 80 च्या वर धावा केल्या आहेत. पण त्यानंतर तो जखमी झाला. पण त्याची निवड न करण्याचं काही कारणच शिल्लक राहात नाही.’ केएल राहुल 50 कसोटी सामन्यातील 86 डावात खेळला आहे. यात त्याने 8 शतकं आणि 14 अर्धशतकं झळकावली आहेत. त्याने 52.23 च्या स्ट्राईक रेटने 2863 धावा केल्या आहेत. 199 ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे.
कर्णधार रोहित शर्माने युवा खेळाडूंची स्तुतीही केली. रोहित शर्माने सांगितलं की, यशस्वी जयस्वाल, सरफराज खान आणि ध्रुव जुरेलला परिपक्व व्हावं लागेल. जयस्वालने कठीण परिस्थितीत चांगली कामगिरी केली आहे. सरफराज खान आणि जुरेल निडर होत खेळ खेळला आहे. चेन्नईत सराव शिबिरात चांगली तयारी झाली आहे. काही खेळाडू दुपी ट्रॉफी स्पर्धेतही खेळते आहेत. टीम इंडियाच प्रत्येक खेळाडू नव्या पर्वासाठी तयार असल्याचं, रोहित शर्माने सांगितलं.