विशाखापट्टणम | टीम इंडियाने दुसऱ्या कसोटीतील पहिल्या डावात ऑलआऊट 396 धावा केल्या. त्यानंतर बॅटिंगसाठी आलेल्या इंग्लंडने सावध सुरुवात केली. इंग्लंडच्या फलंदाजांनी पहिल्या 2 विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. झॅक क्रॉली आणि बेन डकेट या सलामी जोडीने 59 रन्सची पार्टनरशीप केली. त्यानंतर बेन डकेट 21 धावा करुन आऊट झाला. त्यानंतर झॅक क्रॉली आणि ओली पोप या दोघांमध्ये 55 धावांची भागादारी झाली. श्रेयस अय्यर याने घेतलेल्या अप्रतिम कॅचमुळे झॅकला 76 धावांवर माघारी जावं लागलं. इंग्लंडने 396 धावांच्या प्रत्युत्तरात आश्वासक सुरुवात केली. मात्र त्यानंतर टीम इंडियाच्या गोलंदाजांनी इंग्लंडला ठराविक अंतराने 3 झटके देत बॅकफुटवर ढकललं.
झॅक आऊट झाल्याने इंग्लंडची 2 बाद 114 अशी स्थिती झाली. त्यानंतर यॉर्कर किंग जसप्रीत बुमराह याने इंग्लंडला दणका दिला. टीम इंडियासमोर इंग्लंडने 45 धावांच्या मोबदल्यात 3 झटके दिले. बुमराहने जो रुट याला 5 धावांवर स्लीपमध्ये असलेल्या शुबमन गिल याच्या हाती कॅच आऊट केलं. ओली पॉप हा हैदराबाद कसोटीत इंग्लंडच्या विजयाचा शिल्पकार ठरला. बुमराहने ओली पोप यांच्या दांड्या गुल केल्या. बुमराहने अचूक यॉर्कर टाकला. या यॉर्करवर ओली पोप गोंधळला आणि 2 स्टंप्स उडाले. ओली पोप 23 धावा करुन माघारी परतला.
बुमराहने ओली पोप याच्यानंतर जॉनी बॅरिस्टो याचा कार्यक्रम केला. बुमराहने गिलच्या हाती बॅरिस्टोला 25 धावांवर आऊट केलं. त्यानंतर कुलदीपने दबावात असलेल्या इंग्लंडला आणखी अडचणीत टाकत आणखी एक विकेट घेतली. कुलदीपने बेन फोक्स याला क्लिन बोल्ड केलं. फोक्स 6 धावांवर आऊट झाला. त्यामुळे इंग्लंडची 6 बाद 172 अशी स्थिती झाली. इंग्लंड अजूनही 224 धावांनी पिछाडीवर आहे. आता टीम इंडियाच्या गोलंदाजांचा इंग्लंडला झटपट गुंडाळून मोठी आघाडी घेण्याचा प्रयत्न असणार आहे.
इंग्लंड प्लेईंग ईलेव्हन | बेन स्टोक्स (कॅप्टन), झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स (विकेटकीपर), रेहान अहमद, टॉम हार्टले, शोएब बशीर आणि जेम्स अँडरसन.
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, श्रीकर भारत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मुकेश कुमार.