मुंबई | टीम इंडियाला पहिल्या कसोटी सामन्यातील पराभवानंतर 2 झटके लागले. बॅट्समन केएल राहुल आणि ऑलराउंडर रवींद्र जडेजा दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटीतून बाहेर पडले. तर या दोघांच्या जागी टीम इंडियात ऑलराउंडर वॉशिंग्टन सुंदर, सौरभ कुमार आणि सरफराज खान या तिघांना संधी देण्यात आली. सरफराज खान याची निवड होण्याची ही पहिलीच वेळ ठरली. टीम इंडियाने पहिला सामना गमावल्याने दुसऱ्या कसोटीत प्लेईंग ईलेव्हनमध्ये बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील दुसरा सामना हा 2 ते 6 फेब्रुवारी दरम्यान विशाखापट्टणम येथे आयोजित करण्यात आला आहे. इंग्लंड मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. विजयी संघात सहसा बदल केला जात नाही. त्यानुसार, इंग्लंड पहिल्या सामन्यातील प्लेईंग ईलेव्हनसह मैदानात उतरु शकते. मात्र टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हनमध्ये बदल केले जाऊ शकतात.
रजत पाटीदार हा देखील दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियात आहे. विराट कोहली याने पहिल्या 2 सामन्यांमधून माघार घेतल्यानंतर त्याच्या जागी रजत पाटीदार याला संधी देण्यात आली आहे. रजतने दक्षिण आफ्रिका विरुद्ध वनडे डेब्यू केलं. तसेच तो आयपीएलमध्ये आरसीबीकडून खेळतो. रजतने देशांतर्गत क्रिकेटमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. रजतने टीम इंडिया ए साठीही चांगली खेळी केली आहे.
तर दुसऱ्या बाजूला सरफराज खान याचाही दुसऱ्या कसोटीसाठी समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे रजत पाटीदार याला शुबमनचा पत्ता कट करुन रजतला तिसऱ्या स्थानी खेळवलं जाऊ शकतं. तर केएल राहुल याच्या जागी सरफराजची वर्णी लागू शकते. सरफराजला संधी मिळाल्यास त्याचं कसोटी पदार्पण ठरेल.
आता ऑलराउंडर रवींद्र जडेजा याच्या जागी कुणाला घ्यायचं हे खेळपट्टी पाहून ठरवलं जाईल. पण जशास तसं हवं असेल तर वॉशिंग्टन सुंदर याला संधी मिळू शकते. अशात कुलदीप यादव याला दुसऱ्या कसोटी सामन्यातही प्लेईंग ईलेव्हनमधून बाहेर रहावं लागेल.
इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाची संभावित प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल/रजत पाटीदार, सरफराज खान, श्रेयस अय्यर, केएस भरत (विकेटकीपर), अक्षर पटेल, वाशिंगटन सुंदर, आर अश्विन, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.