मुंबई : भारत इंग्लंड यांच्यातील पाच सामन्याच्या मालिकेतील तिसरा सामना राजकोटमध्ये सुरु आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने 5 गडी 326 धावा केल्या. पहिला दिवस कर्णधार रोहित शर्मा, रवींद्र जडेजा आणि सरफराज खान यांनी गाजवला आहे. पहिल्या सत्रात टीम इंडियाची नाजूक स्थिती होती. 3 बाद 33 धावा असतात रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजा ही जोडी मैदानात उतरली होती. या जोडीने 204 धावांची भागीदारी करत टीम इंडियाचा डाव सावरला. कर्णधार रोहित शर्माने 196 चेंडूचा सामना करत 131 धावा केल्या. या खेळीत त्याने 14 चौकार आणि 3 षटकार ठोकले. तर रोहित शर्मा बाद झाल्यानंतर हा डाव रवींद्र जडेजा आणि सरफराज खान यांनी पुढे नेला. पाचव्या गड्यासाठी दोघांनी 77 धावांची भागीदारी केली. मात्र रवींद्र जडेजाच्या चुकीच्या कॉलमुळे सरफराज खानला रनआऊट व्हावं लागलं. त्याने 66 चेंडूत 62 धावांची खेळी केली. यात 9 चौकार आणि 1 षटकाराचा समावेश होता. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा रवींद्र जडेजा नाबाद 110 धावा आणि कुलदीप यादव 1 धावसंख्येवर खेळत होता. आता दुसऱ्या दिवशी या धावसंख्येत आणखी भर पडणार आहे.
इंग्लंडकडून सर्वाधिक गडी बाद करण्यात मार्क वूडला यश आलं. त्याने 17 षटकात 69 धावा देत 3 गडी बाद केले. तर टॉम हार्टलेला एक गडी बाद करण्यात यश आलं. पहिल्या डाव आपल्या बाजूने वळवायचा असल्यास 400 पार धावा करण्याची आवश्यकता आहे. तसेच इंग्लंडच्या फलंदाजांना झटपट बाद करण्याचं आव्हान देखील असणार आहे. दुसरीकडे, तिसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात शुबमन गिल फेल ठरला आहे. 9 चेंडूंचा सामना केला खरा पण एकही धाव करता आली नाही.
भारत (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जयस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
इंग्लंड (प्लेइंग इलेव्हन): झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), बेन फोक्स (विकेटकीपर), रेहान अहमद, टॉम हार्टले, मार्क वुड, जेम्स अँडरसन