मुंबई : भारत इंग्लंड यांच्यात पाचवा कसोटी सामना सुरु आहे. तिसऱ्या दिवशीच भारताला विजय मिळतो की काय अशी स्थिती आहे. असं असताना भारताच्या गोटात एका बातमीमुळे खळबळ उडाली आहे. तिसऱ्या दिवशी कर्णधारपदाची धुरा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या खांद्यावर टाकली गेली आहे. अचानक मैदानात अशी स्थिती पाहून क्रीडारसिकांना टेन्शन आलं. असं अचानक जसप्रीत बुमराहला कॅप्टन्सी सोपण्याचं कारण काय? रोहित शर्माला नेमकं काय झालं? असे एक ना अनेक प्रश्न चाहत्यांच्या मनात पडले. त्यानंतर बीसीसीआयकडून रोहित शर्मा तिसऱ्या दिवशी मैदानात उतरला नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं. तसेच त्याल पाठ दुखीचा त्रास होत असल्याचं कारण त्यात देण्यात आलं आहे. त्यामुळे रोहित शर्माच्या चाहत्यांचं टेन्शन वाढलं आहे. कारण कसोटी सामन्यानंतर आयपीएलची रणधुमाळी आहे. रोहित शर्माचे चौकार षटकारांची आतषबाजी पाहण्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. असं असताना रोहित शर्माला पाठदुखीचा त्रास झाल्याने चाहत्यांना टेन्शन आलं आहे.
अवघ्या दहा दिवसांनी आयपीएल स्पर्धेचं बिगुल वाजणार आहे. मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायंट्स यांच्यात पहिला सामना होणार आहे. पहिला सामना 24 मार्चला होणार आहे. असं असताना रोहित शर्मा तिथपर्यंत बरा होईल ना? अशी चिंता चाहत्यांना खात आहे. मुंबई इंडियन्सचा संघ पहिल्यांदाच हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात मैदानात उतरणार आहे. रोहित शर्माला त्याच्या नेतृत्वात फलंदाजीसाठी उतरण्याची रणनिती आखली गेली होती. पण असं घडल्याने मुंबई इंडियन्सचीही धाकधूक वाढली आहे.
दरम्यान, रोहित शर्मा सध्या जबरदस्त फॉर्मात आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने पुन्हा एकदा टी20 ची धुरा सांभाळली आहे. तसेच अफगाणिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यात शतकी खेळी केली. त्याचबरोबर इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकाही जिंकली आहे. पाचव्या कसोटी सामन्यात रोहित शर्माने शतकी खेळी केली. 162 चेंडूत 103 धावा केल्या. या खेळीत 13 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश आहे. या खेळीतून त्याने अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे.