मुंबई : भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरु होत आहे. या मालिकेतील पहिला सामना हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियममध्ये होणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ सज्ज आहेत. इंग्लंडने एक पाऊल पुढे जात पहिल्या सामन्यासाठी नाणेफेकीआधीच प्लेइंग इलेव्हन जाहीर केली आहे. तर दुसरीकडे, प्लेइंग इलेव्हन जाहीर करताना रोहित शर्माची डोकेदुखी वाढली आहे. सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत त्याने याबाबत कबुलीही दिली आहे. प्लेइंग इलेव्हनमध्ये कुलदीप यादव की अक्षर पटेल स्थान मिळणार? याबाबत विचारण्यात आलं. तेव्हा या दोघांबाबत कर्णधार रोहित शर्माला मोठं स्पष्टीकरण द्यावं लागलं. स्पष्टीकरण दिल्यानंतरही शेवटी या दोघांपैकी एकाची निवड करणं खूपच कठीण असल्याची कबुलीही दिली. रोहित शर्माने सुरुवातीला कुलदीप यादवचं कौतुक केलं. त्यानंतर अक्षर पटेलची जमेची बाजूही सांगितली.
“कुलदीप यादवने त्याच्या गोलंदाजीने अनेकदा प्रतिस्पर्धी संघाला बॅकफूटला ढकललं आहे. खेळपट्टी उसळी घेणारी असो की नसो..कुलदीपकडे चांगलं व्हेरियशन आहे. दोन वर्षानंतर त्याने क्रिकेटमध्ये कमबॅक केलं असून एक परिपक्व गोलंदाज आहे. तो भारतात जास्त कसोटी सामने खेळला नाही. कारण आर अश्विन आणि रवींद्र जडेजा संघात होते. पण त्याच्या गोलंदाजीला आता धार आली आहे. त्यामुळे तो एक पर्याय असेल.”, असं रोहित शर्मा याने सांगितलं.
“कुलदीपसोबत अक्षर पटेलही चांगला पर्याय आहे. अष्टपैलू खेळाडू आहे. त्याने त्याच्या फलंदाजीतून दाखवून दिलं आहे. संघाच्या वाईट स्थितीत तो उभा राहिला आहे. हे आपण अनेकदा पाहिलं आहे. त्यामुळे या दोघांपैकी एकाची निवड करणं डोकेदुखी ठरणार आहे.” असंही रोहित शर्मा याने पुढे सांगितलं.
पहिल्या कसोटीसाठी इंग्लंड प्लेइंग इलेव्हन : बेन स्टोक्स (कर्णधार), झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जॉनी बेयरस्टो, बेन फॉक्स (विकेटकीपर), रेहान अहमद, मार्क वुड, टॉम हार्टले आणि जॅक लीच.