मुंबई : टीम इंडिया आणि इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना काही दिवसांवर आला आहे. टीम इंडियाने रोहित शर्मा याच्या नेतृत्त्वाखाली पाच सामन्यांच्या मालिकेत 3-1 ने आघाडी घेतली आहे. हा सामना धर्मशाला येथे येत्या 7 मार्चला होणार आहे. या सामन्यामध्ये टीम इंडियाच्या इडियाच्या प्लेइंग 11 मध्ये बदल झालेला दिसू शकतो. संपूर्ण मालिकेमध्ये अपयशी ठरलेल्या खेळाडूला टीम मॅनेजमेंट बसवण्याचा निर्णय घेऊ शकतो. त्याच्या जागी संघात देवदत्त पड्डिकल याला संधी मिळण्याची माहिती समजत आहे.
टीम इंडियाने आतापर्यंत खेळलेल्या चार कसोटी सामन्यांमध्ये अनेक चढ उतार पाहिले. कारण अनेक मोठे खेळाडू जखमी झालेले, यामध्ये के.एल. राहुल, श्रेयस अय्यर आणि रविंद्र जडेजा यांची नावं आहेत. विराट कोहली हा संपूर्ण मालिका बाहेर असल्यामुळे त्याची जागाही खाली होती. रोहित शर्मा याने टीममधील युवा खेळाडूंना संधी देत मालिका जिंकली. यामध्ये यशस्वी जयस्वाल, सर्फराज खान, ध्रुव जुरेल आणि आकाश दीप या खेळाडूंचा समावेश आहे. मात्र एक असा खेळाडू ज्याला अनेक संधी देऊनही काही चमकदार कामगिरी करता आली नाही.
हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून रजत पाटीदार आहे. के.एल. राहुल बाहेर गेल्याने परत एकदा त्याला संधी मिळाली होती. मात्र त्याला चौथ्या सामन्यातही काही चमक दाखवता आली नाही. दुसऱ्या डावात त्याने टिकून फलंदाजी केली असती तर टीम इंडियाच्या विजयाची धाव त्याला घेता आली असती. मात्र गडी भोपळाही न फोडता माघारी गेला होता. त्यामुळे त्याच्या जागी देवदत्त पड्डिकल याला संधी मिळू शकते.
दरम्यान, देवदत्त पडिक्कलही फॉर्मात आहे. 23 वर्षीय देवदत्त पडिक्कलने 31 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 44.54 च्या उत्कृष्ट सरासरीने 2227 धावा केल्या आहेत ज्यात 6 शतके आणि 12 अर्धशतकांचा समावेश आहे. पडिक्कलची प्रथम श्रेणी सामन्यातील सर्वोच्च धावसंख्या 193 धावा आहेत.