मुंबई : इंग्लंड विरुद्ध भारत पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताने 4-1 ने सरशी घेतली. मालिकेतील पहिला सामना गमवल्यानंतर टीम इंडियाने जबरदस्त कमबॅक केलं. तसेच इंग्लंडच्या बेझबॉल रणनितीची पिसं काढली. पाचव्या कसोटीत नाणेफेकीचा कौल जिंकून इंग्लंडने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि इथेच सर्वकाही फसलं. पहिल्या डावात इंग्लंडने सुरुवात चांगली केली. पण कुलदीप यादव, आर अश्विन आणि रवींद्र जडेजाच्या फिरकीच्या जाळ्यात इंग्लंडचे गोलंदाज सहज अडकले. इंग्लंडचा पहिला डाव 218 धावांवर आटोपला. त्यानंतर भारताने पहिल्या डावातील इंग्लंडची 218 धावांची आघाडी मोडली. तसेच सर्वबाद 477 धावा केल्या. यामुळे भारताकडे 259 धावांची मजबूत आघाडी आली. ही आघाडी मोडून काढणं काही इंग्लंडला शक्य झालं नाही. आर अश्विनच्या फिरकीपुढे इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत परतला.
भारताने मालिका 4-1 ने जिंकल्याने टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये जबरदस्त फायदा झाला आहे. गुणातालिकेतील अव्वल स्थान कायम ठेवलं असून विजयी टक्केवारीत वाढ झाली आहे. ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड कसोटी सामन्याचा निकाल काहीही लागला तरी त्याचा भारताच्या अव्वल स्थानावर काही एक परिणाम होणार नाही. त्यामुळे आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीकडे खऱ्या अर्थाने भारताने कूच केली आहे. भारताला आता बांगलादेशविरुद्ध 2 कसोटी, न्यूझीलंडविरुद्ध 3 आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध 5 कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे.
भारतात आघाडीचे फलंदाज नसताना टीम इंडियाने रोहित शर्माच्या नेतृत्वात जबरदस्त कामगिरी केली. त्यामुळे दिग्गज खेळाडूंची उणीव कुठेच भासली नाही. उलट नवोदित खेळाडूंना संधी मिळाल्याने त्यांना आपली चमकदार कामगिरी दाखवण्याची संधी मिळाली. बऱ्याचदा नवोदित खेळाडूंना विदेशी धरतीवर संधी मिळते. अशावेळी स्वत:ला सिद्ध करणं कठीण होतं. पण दिग्गज खेळाडूंच्या अनुपस्थितीमुळे ही संधी आपसूकच नवोदित खेळाडूंकडे चालत आली आणि त्यांनी संधीचं सोनं केलं. या मालिकेत सरफराज खान, यशस्वी जयस्वाल, ध्रुव जुरेल, देवदत्त पडिक्कल यांनी जबरदस्त कामगिरी केली. त्यामुळे या खेळाडूंचं कसोटीतील भविष्य प्रकाशमय असल्याचं दिसून येत आहे.
भारत (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जयस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, देवदत्त पडिक्कल, रवींद्र जडेजा, सरफराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
इंग्लंड (प्लेइंग इलेव्हन): झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, बेन स्टोक्स (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स (विकेटकीपर), टॉम हार्टले, शोएब बशीर, मार्क वुड, जेम्स अँडरसन