टीम इंडिया इंग्लंडविरुद्ध नववर्षात एकूण 5 सामन्यांची टी20 सीरिज खेळणार आहे. बीसीसीआय निवड समितीने शनिवारी 11 जानेवारीला इंग्लंडविरुद्धच्या मायदेशातील या मालिकेसाठी 15 सदस्यीय संघ जाहीर केला. उभयसंघात या मालिकेत एकूण 5 सामने खेळवण्यात येणार आहे. सूर्यकुमार यादव हा टीम इंडियाचं नेृत्व करणार आहे. तर अक्षर पटेल याची उपकर्णधारपदी वर्णी लागली आहे. तर मोहम्मद शमी याची टी 20i संघात 2 वर्षांनंतर एन्ट्री झाली आहे. ऋतुराज गायकवाड याला संधी न दिल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. ऋतुराजकडे निवड समिती आणि टीम मॅनेजमेंटकडून सातत्याने दुर्लक्ष का केलं जात आहे? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. आश्चर्याची बाब म्हणजे गौतम गंभीर हेड कोच झाल्यापासूनच ऋतुराजला टी 20i संघात संधी मिळालेली नाही. त्यामुळे गंभीरकडून ऋतुराजला जाणिवपूर्वक डच्चू दिला जातोय का? असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित होत आहे.
गौतम गंभीरने श्रीलंका दौऱ्यापासून टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची धुरा सांभाळली. तेव्हापासून टीम इंडियाने एकूण 3 मालिका खेळल्या आहेत. टीम इंडियाने श्रीलंका, बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी 20 मालिका खेळली. ऋतुराजचा या तिन्ही संघात समावेश करण्यात आलेला नव्हता. तसेच बांगलादेशविरुद्धच्या मालिकेसाठी ऋतुराज याला संधी मिळणार नसल्याची शक्यता आधीपासूनच बोलून दाखवली जात होती.
टीम इंडिया विरुद्ध बांगलादेश यांच्यात 6 ते 12 ऑक्टोबर दरम्यान टी 20i मालिकेचं आयोजन करण्यात आलं होतं. तर 28 सप्टेंबरला या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली होती. तर बीसीसीआयने 24 सप्टेंबरला इराणी ट्रॉफीत 1 ते 5 ऑक्टोबर दरम्यान इंडिया विरूद्धच्या सामन्यासाठी रेस्ट ऑफ इंडिया संघाची घोषणा केली होती. बीसीसीआयने ऋतुराजला रेस्ट ऑफ इंडियाचं कर्णधार केलं होतं. हा सामना लखनऊ आयोजित करण्यात आला होता. तर बांगलादेशविरुद्धचा पहिला सामना हा 6 ऑक्टोबरला ग्वाल्हेर येथे पार पडणार होता. त्यामुळेच ऋतुराजला बांगलादेशविरुद्ध संधी मिळणार नसल्याचं म्हटलं जात होतं, जे खरं ठरलं.
टीम इंडियाने बांगलादेशनंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी 20i मालिका खेळली. ऋतुराजचा त्या मालिकेतही समावेश करण्यात आला नाही. त्यानंतर आता इंग्लंडविरुद्धही ऋतुराजला संधी देण्यात आलेली नाही. ऋतुराज आयपीएलमध्ये चेन्नईसाठी खेळतो. तसेच महेंद्रसिंह धोनी हा चेन्नईचा माजी कर्णधार आहे.गंभीरने अनेकदा धोनीबाबत स्पष्ट भूमिका घेतली आहे. त्यामुळे गंभीरने ऋतुराजबाबतचा निर्णय हा धोनीद्वेषातून घेतलाय की काय? असा प्रश्न नेटकऱ्यांकडून सोशल मीडियावर उपस्थित केला जात आहे.
पहिला सामना, बुधवार 22 जानेवारी, इडन गार्डन
दुसरा सामना, शनिवार 25 जानेवारी, चेन्नई
तिसरा सामना, मंगळवार 28 जानेवारी, राजकोट
चौथा सामना, शुक्रवार 31 जानेवारी, पुणे
पाचवा सामना, रविवार 2 फेब्रुवारी, मुंबई
टी 20 सीरिजसाठी इंग्लंड टीम : जोस बटलर (कर्णधार) रेहान अहमद, जोफ्रा आर्चर, गुस ऍटकिन्सन, जेकब बेथेल, हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्स, बेन डकेट, जेमी ओव्हरटन, जेमी स्मिथ, लियाम लिव्हिंगस्टोन, आदिल रशीद, साकिब महमूद, फिल सॉल्ट आणि मार्क वुड.
इंग्लंडविरुद्धच्या टी 20i मालिकेसाठी भारतीय संघ : सूर्यकुमार यादव (कॅप्टन), अक्षर पटेल (उपकर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, रिंकू सिंह, नीतीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, अर्शदीप सिंह, मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई आणि वॉशिंगटन सुंदर.