भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची टी20 मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. टी20 संघाचं कर्णधारपद सूर्यकुमार यादवच्या खांद्यावर आहे. पण उपकर्णधारपदासाठी वेगळं नाव पुढे आल्याने आश्चर्याचा धक्का बसला आहे. संघात हार्दिक पांड्या असताना उपकर्णधारपदासाठी अक्षर पटेलची निवड केली गेली आहे. त्यामुळे क्रीडावर्तुळात चर्चा रंगली आहे. टीम इंडियात नेमकं काय सुरु आहे याबाबतही अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. टी20 वर्ल्डकप जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याकडे जबाबदारी येईल असं वाटत होतं. पण सूर्यकुमार यादवला कर्णधार केलं गेलं. त्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी अक्षर पटेलला उपकर्णधार म्हणून जबाबदारी सोपवली आहे. दुसरीकडे, मोहम्मद शमीची या संघात निवड झाली आहे. टी20 संघात मोहम्मद शमीला दोन वर्षांनी संधी मिळाली आहे. तर जवळपास 14 महिन्यांनी आंतरराष्ट्रीय संघात पदार्पण करत आहे. त्यामुळे त्याची निवड वनडे मालिकेतही होण्याची दाट शक्यता आहे.
खरं तर टी20 मालिकेनंतर भारतीय संघ तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. या मालिकेत जो संघ निवडला जाईल तोच संघ चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी असेल यात काही शंका नाही. कारण इंग्लंडविरुद्धची वनडे मालिका आणि चॅम्पियन्स ट्रॉफी यासाठी फार काही अंतर नाही. दुसरं चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीमची घोषणा करण्याची डेडलाईनही जवळ आहे. त्यामुळे टी20 संघातील काही खेळाडूंना वनडे संघात स्थान मिळेल यात काही शंका नाही. त्यामुळे अक्षर पटेलला दिलेली जबाबदारी पाहता तो वनडे संघातही असू शकतो असं दिसून येत आहे.
22 जानेवारीपासून इंग्लंडविरुद्ध सुरू होणाऱ्या आगामी IDFC फर्स्ट बँक पाच सामन्यांच्या टी20 मालिकेसाठी भारताच्या 15 सदस्यीय संघाची निवड केली आहे. दुसरा सामना 25 जानेवारीला, तिसरा सामना 28 जानेवारीला, चौथा सामना 31 जानेवारीला आणि पाचवा सामना 2 फेब्रुवारीला होणार आहे.
इंग्लंडविरुद्धच्या T20I मालिकेसाठी भारताचा संघ: सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, रिंकू सिंग, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल (उपकर्णधार), हर्षित राणा, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी , वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, वॉशिंग्टन सुंदर, ध्रुव जुरेल (विकेटकीपर).