भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका आणि तीन सामन्यांची वनडे मालिका होणार आहे. वनडे मालिकेसाठी भारताचा संघ अजूनही निवडलेला नाही. पण टी20 मालिकेसाठी सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात संघाची घोषणा केली आहे. या संघात भारताच्या दिग्गज गोलंदाजांचं नाव असल्याने क्रीडाप्रेमींनी आनंद व्यक्त केला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी टी20 संघात मोहम्मद शमीला स्थान देण्यात आलं आहे. 22 जानेवारीपासून इंग्लंडविरुद्धची टी20 मालिका सुरु होणार आहे. या मालिकेत मोहम्मद शमी असल्याने क्रीडाप्रेमींचा जीव भांड्यात पडला आहे. कारण टी20 मालिकेसाठी निव़ड होणं म्हणजेच शमी फीट असल्याचं लक्षण आहे. त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी त्याची निवड होणार यात काही शंका नाही.
मोहम्मद शमी नोव्हेंबर 2023 मध्ये शेवटचा वनडे सामना खेळला होता. वनडे वर्ल्डकप स्पर्धेत अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना खेळला होता. मात्र त्यानंतर दुखापतीमुळे शस्त्रक्रिया झाली. त्यामुळे जवळपास 14 महिने आंतरराष्ट्रीय सामन्यांपासून दूर राहिला. देशांतर्गत स्पर्धत शमीने आपल्या गोलंदाजीची धार पुन्हा एकदा दाखवली. त्यामुळे त्याची संघात निवड झाली आहे. जसप्रीत बुमराहच्या साथीला मोहम्मद शमी असेल या बातमीनेच क्रीडाप्रेमी सुखावले आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी मोहम्मद शमीची निवड होईल अशी शक्यता क्रीडाप्रेमी व्यक्त करत आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा 19 फेब्रुवारीपासून होणार आहे. तत्पूर्वी भारताची इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत रंगीत तालिम असेल. भारताचा पहिला सामना बांगलादेशविरुद्ध 20 फेब्रुवारीला होणार आहे. भारताचे सर्व सामने दुबईला होणार आहेत.
भारताचा टी20 मालिकेसाठी असा संघ : सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, यशस्वी जयस्वाल, तिलक वर्मा, नितीश रेड्डी, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंह, हर्षित राणा, ध्रुव जुरेल, रिंकू सिंह, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवि बिश्नोई, वरुण चक्रवर्ती और वाशिंगटन सुंदर.