मुंबई : भारत इंग्लंड यांच्यात तिसरा कसोटी सामना गुरुवारपासून राजकोट येथे सुरु होणार आहे. या सामन्यातील विजय दोन्ही संघासाठी महत्त्वाचा आहे. या सामन्यातून रवींद्र जडेजा पुनरागमन करणार आहे. दुसऱ्या कसोटीमध्ये रवींद्र जडेजा दुखापतीमुळे खेळला नव्हता. त्याच्या अनुपस्थितीतही सामना जिंकण्यात टीम इंडियाला यश आलं होतं. असं असलं तरी रवींद्र जडेजाची उणीव भासली होती. आता तिसऱ्या कसोटीपासून रवींद्र जडेजाने महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. दुखापत होऊच नये यासाठी मोठं पाऊल उचललं आहे. “वारंवार दुखापत होणं निराशाजनक आहे. पण सध्या क्रिकेटचे भरपूर सामने होत असून तेच डोक्यात असतं. मी मैदानात फार काळ लपू शकत नाही. मी कोणत्याही फॉर्मेटमध्ये महत्त्वाच्या ठिकाणी उभा असतो. जखमी होण्याचं प्रमुख कारण तेच असावं. कारण चेंडू जास्तीत जास्त माझ्या जवळ येत असतो.”, असं रवींद्र जडेजाने सांगितलं.
“मी सामन्यात माझं 100 टक्के देऊ इच्छितो यात दुमत नाही. पण शारीरिक इजा होणार नाही याची काळजी घेईन. जेव्हा गरज नसेल तेव्हा उडी मारणार नाही. बस हाच एक प्लान आहे. मी याच्याबाबत जास्त विचार करत नाही. कारण असं यापूर्वीही झालं आहे.”, असं रवींद्र जडेजा याने सांगितलं. तिसऱ्या कसोटी सामना निर्णायक असणार आहे. तिसरा सामना जिंकल्यानंतर मालिका खिशात घालणं सोपं होईल. तर पराभूत झालेल्या संघाला कमबॅक करणं कठीण होईल.
“राजकोटमधील विकेट सपाट आणि टणक आहे. ही खेळपट्टी कशी तयार केली आहे यावर सर्वकाही अवलंबून आहे. विकेट चांगली दिसत आहे. इथली विकेट प्रत्येक सामन्यात वेगळी भासते. कधी पाटा विकेटवर गोलंदाजी करणं कठीण होतं. तर कधी फिरकीला अनुकूल असते. कधी कधी दोन दिवस काहीच होत नाही. त्यानंतर चेंडू वळायला लागतो. सुरुवातीला विकेट चांगली राहील. त्यानंतर फिरकीला मदत मिळेल.”, असं रवींद्र जडेजाने सांगितलं.
तिसऱ्या कसोटी सामन्यात रजत पाटीदारला पुन्हा संधी मिळणार की, सरफराज आणि ध्रुव जुरेलला पदार्पणाची संधी मिळते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. रवींद्र जडेजाने यावर भाष्य करत सांगितलं की, “नवख्या खेळाडूंना प्रथम श्रेणी क्रिकेट खेळण्याचा अनुभव गाठीशी आहे. त्यांना कसोटी क्रिकेट कसं खेळायचं हे माहिती आहे.”