मुंबई : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 च्या दृष्टीने भारत इंग्लंड ही कसोटी मालिका खूपच महत्त्वाची आहे. प्रत्येक सामन्यातील निकाल गुणतालिकेचं चित्र बदलणार आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. त्यासाठी दोन्ही संघांची तयारी झाली आहे. भारताला होम ग्राउंडचा लाभ मिळेल अशी चर्चा क्रीडाप्रेमी करत आहे. भारत आरामात इंग्लंडला 5-0 ने मात देईल असंही सांगितलं जात आहे. पण काही अंशी ही अतिशयोक्ति ठरू शकते. कारण इंग्लंड संघाला दुबळं माननं महागात पडू शकतं. इंग्लंडने मागच्या वेळेस कसोटी भारताला थाऱ्यावर आणलं होतं. पाच सामन्यांची कसोटी मालिका 2-2 ने बरोबरीत सोडवली होती. त्यामुळे कर्णधार रोहित शर्मा यावेळी ताकही फुंकून पित आहे. व्हाईट वॉशबाबत प्रश्न विचारल्यानंतर रोहित शर्माने त्यावर आपल्या अंदाजात उत्तर दिलं.
“नाही..नाही..असं मी म्हणू शकत नाही. कधी कधी अशी स्थिती असते की पराभवही होऊ शकतो. पण मागचा रेकॉर्ड पाहता आम्ही आघाडी घेऊ शकतो. आम्ही चांगलं क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करू. इंग्लंड हा एक चांगला संघ आहे. ते कसोटी सामना चांगल्याप्रकारे खेळतात. मागच्या वेळेस इंग्लंडने आम्हाला भारतात पराभूत केलं आहे. पण त्यालाही बराच काळ लोटला आहे. तेव्हाचे खेळाडू आणि आताच्या खेळाडूंमध्ये बराच बदल झाला आहे. पण त्या संघामध्ये अजूनही ती क्षमता आहे. त्यामुळे या मालिकेत आम्ही आमच्या रणनितीनुसार खेळू.”, असं रोहित शर्मा म्हणाला.
2021 साली इंग्लंड संघ भारत दौऱ्यावर आला होता . तेव्हा पहिला सामना ड्रॉ झाला होता. दुसऱ्या सामन्यात भारताने 151 धावांनी विजय मिळवला. तिसऱ्या सामन्यात इंग्लंडने कमबॅक करत एक डाव आणि 76 धावांनी पराभूत केलं. चौथा सामना भारताने 157 धावांनी जिंकला. पण कोविडमुळे पाचवा सामना रद्द करण्यात आला. त्यानंतर इंग्लंडमध्ये पाचवा सामना खेळला गेला आणि इंग्लंडने हा सामना 7 विकेट्सने जिंकत मालिका बरोबरीत सोडवली होती.
टीम इंडिया : रजत पाटिदार, रोहित शर्मा (कर्णधार), श्रेयस अय्यर, शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), केएल राहुल (विकेटकीपर), श्रीकर भारत (विकेटकीपर), आवेश खान, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार