नवी दिल्ली : भारतानं (IND) दुसऱ्या टी-20 (T-20) सामन्यात आयर्लंडचा (IRE) चार धावांनी पराभव केला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियानं 20 षटकांत 7 गडी गमावून 225 धावा केल्या. प्रत्युत्तरात आयर्लंडनं 20 षटकांत 5 बाद 221 धावा केल्या. उमरान मलिकनं शेवटच्या षटकात चांगली गोलंदाजी करत आयर्लंडला 17 धावा करू दिल्या नाहीत. आयर्लंडच्या डावादरम्यान भुवनेश्वर कुमारच्या पहिल्याच षटकात आयरिश फलंदाजांनी 18 धावा केल्या. T20 क्रिकेटच्या इतिहासात भारतीय संघानं डावाच्या पहिल्याच षटकात 18 धावा दिल्याची ही पहिलीच वेळ आहे. टी-20 मधील भारतासाठी हे सर्वात महागडे षटक ठरले. यापूर्वी इंग्लंडने 2014 मध्ये बर्मिंगहॅम येथे भारताविरुद्ध पहिल्या षटकात 17 धावा केल्या होत्या आणि 2016 मध्ये लॉडरहिल येथे वेस्ट इंडिजनं 17 धावा केल्या होत्या.
या सामन्यात टीम इंडियासाठी दीपक हुडा आणि संजू सॅमसन यांनी उत्कृष्ट खेळी खेळली. हुडानं टी20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले. त्यानं 57 चेंडूंत नऊ चौकार आणि सहा षटकारांच्या मदतीने 104 धावा केल्या. दीपक हुडा हा भारताकडून टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये शतक झळकावणारा चौथा फलंदाज आहे. त्याच्या आधी रोहित शर्मा (चार शतके), केएल राहुल (दोन शतके) आणि सुरेश रैनाने (एक शतक) शतके झळकावली आहेत. त्याचवेळी सॅमसननं आपल्या टी-20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिले अर्धशतक झळकावले. सॅमसननं 42 चेंडूंत नऊ चौकार आणि चार षटकारांच्या मदतीनं 77 धावा केल्या.
T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक झळकावणारा हुड्डा चौथा भारतीय ठरला. त्याने 57 चेंडूत नऊ चौकार आणि सहा षटकारांसह 104 धावा केल्या. संजू सॅमसनने त्याला चांगला खेळवत 42 चेंडूत नऊ चौकार आणि चार षटकारांसह 77 धावा केल्या. ऋतुराज गायकवाडच्या दुखापतीमुळे सॅमसनला या सामन्यात संधी मिळाली. हुड्डा आणि सॅमसन या दोघांनीही त्यांच्या डावात फटकेबाजी केली.
भारताची सुरुवात चांगली झाली नाही आणि इशान किशन तीन धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. तिसर्याच षटकात लॉर्कन टकरकडे मार्क एडायरच्या गोलंदाजीवर झेलबाद होऊन त्याने आपली विकेट गमावली. यानंतर हुडा आणि सॅमसन यांनी 85 चेंडूत 176 धावांची भागीदारी करत भारताच्या मोठ्या धावसंख्येचा पाया रचला.