हैदराबाद : टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील वनडे सीरिजमधील पहिला सामना हा बुधवारी (17 जानेवारी) खेळवण्यात येणार आहे. सामन्याला हैदराबादमधील राजीव गांधी स्टेडियममध्ये 1 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. टीम इंडियाचा बॅट्समन श्रेयस अय्यर हा दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडला आहे. त्यामुळे आता टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल होण्याची शक्यता आहे.
कॅप्टन रोहित शर्मा प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करत नव्या चेहऱ्यांना संधी देऊ शकतो. पहिल्या सामन्यात टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन कशी असू शकते, हे आपण जाणून घेऊयात.
पहिल्या सामन्यात कॅप्टन रोहितसोबत शुबमन गिल ओपनिंगला येईल. शुबमनने श्रीलंका विरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली. त्याने या मालिकेत 1 शतक आणि 1 अर्धशतक ठोकलं. इशान किशन केएल राहुलच्या जागी मधल्या फळीत खेळेल. तर शुबमन ओपनिंग करेल, अशी माहिती रोहितने दिली.
तिसऱ्या क्रमांकावर नेहमीप्रमाणे विराट कोहली येईल. विराटने गेल्या 4 वनडे सामन्यांमध्ये 3 शतक ठोकले आहेत. तसेच चौथ्या क्रमांकावर श्रेयसच्या जागी मुंबईकर सूर्यकुमारला संधी मिळू शकते. श्रीलंका विरुद्धच्या मालिकेत रोहितने सूर्याच्या जागी श्रेयसला संधी दिली होती. त्यामुळे सूर्याला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर रहावं लागलं होतं.
केएल राहुल लग्नामुळे या मालिकेत नाही. त्यामुळे पाचव्या स्थानी इशान किशनला संधी मिळेल. इशानने नुकतंत एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक ठोकण्याचा कारनामा केला होता.
तसेच टीममध्ये ऑलराउंडर्स म्हणून हार्दिक पंड्या आणि वॉशिंग्टन सुंदर या दोघांचा समावेश केला जाईल. हार्दिक 6 व्या स्थानी बॅटिंग करेल. तर वॉशिंग्टन 7 व्या क्रमांकावर स्पिन बॉलिंगसोबत टीम इंडियाला मदत करेल.
रोहित वेगवागन गोलंदाजांमध्ये मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि उमरान मलिक या 3 वेगवान गोलंदाजांना संधी मिळेल. तर फिरकी गोलंदाजीची जबाबदारी ही कुलदीप यादवकडे असेल. तर त्याच्या सोबतीला वॉशिंग्टन सुंदर असेल.
टीम इंडिया संभावित प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, इशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, वॉशिंगटन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि उमरान मलिक.