अहमदाबाद : भारत आणि न्यूझीलंडमधील तिसऱ्या टी-20 सामन्यामध्ये टीम इंडियाने किवींच्या गोलंदाजीमधील पिसे काढलीत. सलामीला आलेल्या शुभमन गिलच्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने 200 धावांचा पल्ला पार करत 235 धावांचं आव्हान दिलं आहे. शुभमन गिलने 63 बॉलमध्ये 126 धावांची आक्रमक खेळी केली. भारताने टॉस जिंकल्यावर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. अखेरच्या सामन्यामध्ये किवींना 235 धावायच्या असून हा सामना जिंकणं दोन्ही संघांसाठी महत्त्वाचं आहे.
आजच्या सामन्यामध्ये सलामीला आलेला ईशान किशन फेल गेला. ब्रेसवेलने त्याला पायचीत केलं, त्यानंतर आलेल्या राहुल त्रिपाठीने पॉवर प्लेमध्ये आक्रमक पवित्रा घेतला. राहुलने अवघ्या 22 चेंडूत 44 धावा केल्या.
राहुल बाद झाल्यावर मिस्टर 360 सूर्याने दोन षटकार आणि चौकार मारत झकास सुरूवात केली होती. मात्र त्यालाही मोठी खेळण्यात यश आलं नाही. सूर्या गेल्यावर कप्तान हार्दिक पांड्याने आपली दांडपट्टा चालवला. पांड्याने 17 बॉलमध्ये 30 धावा केल्या. एकीकडे विकेट जात असताना गिलने मैदानात आपले पाय रोवले होते.
शुभमनने शेवटपर्यंत मैदानावर तळ ठोकला होता. 126 धावांच्या खेळीमध्ये त्याने 12 चौकार आणि 7 षटकार मारले. याआधी शुभमनची टी-20 मध्ये 46 सर्वोच्चा धावसंख्या होती. आजच्या सामन्यामध्ये शुभमनने 90 धावा या फक्त चौकार आणि षटकाराच्या मदतीने केल्या.
दरम्यान, न्यूझीलंडचे प्रमुख गोलंदाज लॉकू फर्ग्युसन आणि ईश सोढी यांना अनुक्रमे 54 आणि 50 धावा काढल्या. ब्रेसवेल, टिकनर, सोढी आणि मिचेल यांनी 1 बळी घेण्यात यशं आलं. मालिकेतील निर्णायक सामना असून दोन्ही संघांनी एक विजय मिळवला आहे. आजच्या सामन्यातील विजयी संघ हा मालिका खिशात घालणार आहे.
आजच्या सामन्यासाठी भारतीय संघ – ईशान किशन, शुभमन गिल, राहुल त्रिपाठी, सूर्याकुमार यादव, हार्दिक पांड्या, दीपक हुड्डा, वॉशिंग्टन सुंदर, शिवम मावी, कुलदीप यादव, उमरान मलिक आणि अर्शदीप सिंह