टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील तिसऱ्या आणि अंतिम कसोटी सामन्यातील पहिल्या दिवसाचा खेळ संपला आहे. टीम इंडिया पहिल्या डावात 149 धावांची पिछाडीवर आहे. टीम इंडियाने रवींद्र जडेजा याच्या 5 आणि वॉशिंग्टन सुंदर याने घेतलेल्या 4 विकेट्सच्या जोरावर न्यूझीलंडला 235 धावांवर ऑलआऊट केलं. मात्र त्यानंतर टीम इंडियाची पहिल्या डावात अखेरच्या क्षणी घसरगुंडी झाली. टीम इंडियाने दिवसाचा खेळ संपेपर्यंत झटपट 3 विकेट्स गमावल्या. त्यामुळे टीम इंडिया पुन्हा एकदा बॅकफुटवर गेली आहे. तर न्यूझीलंडने दिवसाचा गोड शेवट करणयात यश मिळवलं.
न्यूझीलंडने 65.4 ओव्हरमध्ये ऑलआऊट 235 रन्स केल्या. न्यूझीलंडसाठी डॅरेल मिचेल याने सर्वाधिक 82 धावा केल्या. तर विल यंग याने 71 धावांचं योगदान दिलं. त्याव्यतिरिक्त इतर कुणालाही वॉशिंग्टन सुंदर आणि रवींद्र जडेजा या फिरकी जोडीने मोठी खेळी करुन दिली नाही. रवींद्र जडेजा याने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. जडेजाची एका डावात 5 विकेट्स घेण्याची 14 वी वेळ ठरली. तर वॉशिंग्टन सुंदर याने 4 विकेट्स घेतल्या. तर आकाश दीपने 1 विकेट मिळवली.
त्यानंतर टीम इंडियाकडून कॅप्टन रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल मुंबईकर सलामी जोडी मैदनात आली. या दोघांकडून मोठ्या आणि चांगल्या सुरुवातीच अपेक्षा होती. मात्र या जोडीने निराशा केली. टीम इंडियाने पहिली विकेट 25 धावांवर गमावली. रोहित शर्मा 18 धावांवर आऊट झाला. त्यानंतर यशस्वी आणि शुबमन गिल या दोघांनी अर्धशतकी भागादारी करत टीम इंडियाचा स्कोअरकार्ड हलता ठेवला. यशस्वी-शुबमन जोडी सेट झाली होती. मात्र यशस्वीने रिव्हर्स स्वीप मारण्याच्या नादात आपली विकेट गमावली आणि ही जोडी फुटली. यशस्वी आणि शुबमन या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 53 धावांची भागीदारी केली. यशस्वीने 52 बॉलमध्ये 4 फोरसह 30 रन्स केल्या. इथून टीम इंडियाची घसरगुंडी झाली.
यशस्वी आऊट झाल्यानंतर मोहम्मद सिराजला नाईट वॉचमॅन म्हणून पाठवलं. पण सिराज आला तसाच परत गेला. सिराज पहिल्याच बॉलवर एलबीडबल्यू आऊट झाला. त्यानंतर विराट कोहली नको ते करुन बसला. विराट स्वत:च्याच कॉलवर 4 धावांवर रन आऊट झाला. विराटची कसोटी क्रिकेटमध्ये रन आऊट होण्याची चौथी वेळ ठरली. विराट आऊट झाल्याने टीम इंडियाची स्थिती 4 बाद 84 अशी झाली. त्यानंतर ऋषभ पंत आणि शुबमन गिल या दोघांनी खेळ संपेपर्यंत 2 धावा जोडल्या. खेळ संपेपर्यंत भारताने 19 षटकात 4 बाद 86 धावा केल्या. शुबमन 31 तर पंत 1 धावेवर नाबाद परतला आहे. तर भारत अद्याप 149 धावांनी पिछाडीवर आहे. न्यूझीलंडकडून अझाज पटेल याने 2 विकेट्स घेतल्या. तर मॅट हॅन्रीने 1 विकेट घेतली.
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सर्फराज खान, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, रवीचंद्रन अश्विन, आकाश दीप आणि मोहम्मद सिराज.
न्यूझीलंड प्लेइंग ईलेव्हन : टॉम लॅथम (कर्णधार), डेव्हॉन कॉनव्हे, विल यंग, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, इश सोधी, मॅट हेन्री, एजाज पटेल आणि विल्यम ओरुर्के.