न्यूझीलंडने टीम इंडियाचं मायदेशातच नाक कापलं. न्यूझीलंडने टॉम लॅथम याच्या नेतृत्वात भारतात इतिहास घडवला. न्यूझीलंडने टीम इंडियाविरुद्ध मालिकेतील पहिल्या सामन्यात विजय मिळवला. न्यूझीलंडने बंगळुरुनंतर पुण्यात टीम इंडियाला लोळवलं आणि मालिका जिंकली. न्यूझीलंडची ही भारतात कसोटी मालिका जिंकण्याची पहिलीच वेळ ठरली. त्यानंतर आता उभयसंघातील तिसरा आणि अखेरचा सामना हा मुंबईतील वानखेडे स्टेडियम येथे खेळवण्यात येणार आहे. कॅप्टन रोहित शर्मा आपल्या घरच्या मैदानात सामान खेळण्यासाठी उत्सुक आहे. रोहित तब्बल 11 वर्षानंतर घरच्या मैदानात कसोटी सामना खेळणार आहे.त्यामुळे रोहितसाठी हा सामना अविस्मरणीय असा असणार आहे.
टीम इंडिया या मालिकेत 0-2 ने पिछाडीवर आहे. त्यात रोहितच्या घरच्या मैदानात तिसरा आणि अंतिम सामना आहे. टीम इंडियावर व्हाईटवॉशची टांगती तलवार आहे. अशात रोहितसाठी कॅप्टन म्हणून आणि घरच्या मैदानात सामना असल्याने हा सामना दोन्ही बाबतीने प्रतिष्ठेचा आहे. त्यामुळे रोहितसेनेचा हा सामना कोणत्याही स्थितीत जिंकण्याचा प्रयत्न असणार आहे. त्यामुळे रोहितकडून टीम इंडियाला आणि चाहत्यांना त्याने 11 वर्षांपूर्वी केलेल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.
रोहितने वानखेडे स्टेडियममध्ये अखेरचा कसोटी सामना हा 2013 साली वेस्ट इंडिज विरुद्ध खेळला होता. सचिन तेंडुलकरच्या कसोटी कारकीर्दीतील हा 200 वा आणि अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना होता. तेव्हापासून रोहित या स्टेडियममध्ये असंख्य सामने जिंकले आहेत. मात्र एकही कसोटी सामना खेळलेला नाही. त्यामुळे मुंबईकरांना आपल्या लाडक्या रोहितला अनेक वर्षांनी घरच्या मैदानात पाहण्याची प्रतिक्षाही संपणार आहे.
रोहितने सचिनच्या निरोपाच्या सामन्यात शतकी खेळी केली होती. रोहितने तेव्हा 127 बॉलमध्ये 11 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 111 धावा केल्या होत्या. तसेच रोहितने त्या संपूर्ण मालिकेत 288 धावा केल्या होत्या. रोहितला त्या कामगिरीसाठी मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं.
दरम्यान रोहितला गेल्या अनेक कसोटी सामन्यांमध्ये त्याच्या लौकीकाला साजेशी अशी खेळी करता आलेली नाही. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना रोहितकडून एका झंझावाती आणि चिवट खेळीची अपेक्षा असणार आहे. त्यामुळे रोहितवर एक कॅप्टन, फलंदाज आणि स्थानिक खेळाडू म्हणून असंख्य अपेक्षा आहेत. आता रोहित या अपेक्षांवर किती खरा उतरतो? हे सामन्यानंतरच स्पष्ट होईल.
तिसऱ्या सामन्यासाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कॅप्टन), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सर्फराज खान, ऋषभ पंत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप आणि वॉशिंग्टन सुंदर.
तिसऱ्या सामन्यासाठी न्यूझीलंड टीम : टॉम लॅथम (कॅप्टन), टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), मार्क चॅपमॅन, डेव्हॉन कॉनव्हे, मॅट हेनरी, डॅरल मिचेल, विल ओ रुर्के, एजाज पटेल, ग्लेन फिलिप्स, रचीन रवींद्र, मिचेल सँटनर, जेकब डफी, इश सोढी, टीम साउथी आणि विल यंग.