धर्मशाळा | टीम इंडिया रोहित शर्मा याच्या नेतृत्वात आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मधील आपला पाचवा सामना 22 ऑक्टोबर रोजी खेळायला उतरणार आहे. टीम इंडियासमोर न्यूझीलंड क्रिकेट टीमचं आव्हान असणार आहे. या सामन्यातं आयोजन हे धर्मशाळा इथे एचपीसीए स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. केन विलियमसन याच्या अनुपस्थितीत टॉम लॅथम न्यूझीलंडचं नेतृत्व करणार आहे. टीम इंडिया आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ वर्ल्ड कप 2023 मध्ये अजिंक्य आहेत. दोन्ही संघांनी आपले 4 सामने जिंकले आहेत. त्यामुळे न्यूझीलंड विरुद्ध टीम इंडिया यांच्यापैकी कोण विजयरथ सुरु ठेवणार याकडे सर्व क्रिकेट चाहत्यांच लक्ष आहे.
टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेशचा धुव्वा उडवला. तर न्यूझीलंडने इंग्लंड, नेदरलँड्स, बांगलादेश आणि अफगाणिस्तानला पराभूत केलंय. टीम इंडियाने 4 ही सामने चेजिंग करताना जिंकले आहेत. तर न्यूझीलंडने 2 वेळा पहिले बॅटिंग आणि 2 वेळा नंतर बॅटिंग करुन सामने जिंकले आहेत. या दोन्ही तुल्यबल संघामध्ये वर्ल्ड कप आणि वनडे क्रिकेटमध्ये कोण वरचढ आहे, हे आपण जाणून घेऊयात.
टीम इंडिया न्यूझीलंड यांच्यात 48 वर्षांमध्ये एकूण 116 एकदिवसीय सामने झाले आहेत. इथे टीम इंडिया न्यूझीलंडवर वरचढ राहिली आहे. टीम इंडियाने 58 तर न्यूझीलंडने 50 सामने जिंकले आहेत. तसेच 7 सामन्यांचा निकाल लागू शकला नाही.
टीम इंडिया-न्यूझीलंड वर्ल्ड कप इतिहासात आतापर्यंत एकूण 8 वेळा आमनेसामने आले आहेत. न्यूझीलंडने या 8 पैकी 5 सामन्यात विजय मिळवला आहे. तर टीम इंडियाला 3 वेळा यश आलं आहे. मात्र दुर्देव असं की टीम इंडियाला न्यूझीलंड विरुद्ध वर्ल्ड कपमध्ये 2003 नंतर एकदाही जिंकता आलेलं नाही. त्यामुळे टीम इंडिया रविवारी होणार सामना जिंकून इतिहास बदलणार की न्यूझीलंड इतिहास कायम राखणार हे महत्त्वाचं असणार आहे.
वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), हार्दिक पांड्या (उपकर्णधार ), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, इशान किशन आणि सूर्यकुमार यादव.
न्यूझीलंड टीम | टॉम लॅथम (कॅप्टन), केन विल्यमसन, ट्रेंट बोल्ट, मार्क चॅपमन, डेव्हॉन कॉनवे, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, डॅरिल मिशेल, जिमी नीशम, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, मिच सँटनर, ईश सोढी, टिम साउथी आणि विल यंग.