धर्मशाळा | रवींद्र जडेजा, टीम इंडियाचा स्टार मॅचविनर ऑलराउंडर. जडेजाने आतापर्यंत टीम इंडियाला आपल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर अनेक विजय मिळवून दिले आहेत. जडेजा याने याच कारणामुळे टीम इंडियात आपलं स्थान पक्कं केलं आहे. टीम इंडियाने आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मध्ये सलग 4 विजय मिळवत जोरदार सुरुवात केली. टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेशचा सुपडा साफ करत विजयी चौकार मारला. त्यानंतर आता टीम इंडिया सलग पाचवा विजय मिळवण्यासाठी न्यूझीलंड विरुद्ध खेळत आहे.
जडेजाने आधीच्या 4 सामन्यात टीम इंडियाच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली. जडेजाने विकेट्स तर घेतल्यात. सोबत त्याने निर्णायक क्षणी विकेट मिळवून देत टीम इंडियाला सामन्यावर घट्ट पकड मिळवण्यात मदत करुन दिली. मात्र जडेजाने न्यूझीलंड विरुद्ध एक घोडचूक करत आतापर्यंत केलेलं सर्व एका झटक्यात गमावलं. जडेजाने केलेली एक चूक ही टीम इंडियाच्या पराभवाचं कारणही ठरु शकतं.
रवींद्र जडेजाने न्यूझीलंडचा इन फॉर्म बॅट्समन रचिन रवींद्र याचा सोपा कॅच सोडला. मोहम्मद शमी न्यूझीलंडच्या डावातील 11 वी ओव्हर टाकायला आला. या ओव्हरमधील पाचव्या बॉलवर रचिनने फटका मारला. रचिनने मारलेला शॉट जडेजाच्या दिशेने गेला. मात्र जडेजाने लॉलीपॉप कॅच सोडला. अफलातून कॅच घेणारा जडेजा कॅच सोडू शकतो, यावर कुणालाच विश्वास बसत नाहीये. रचिनचा कॅच ड्रॉप झाला यापेक्षा तो जडेजाने सोडला, याचाच धक्का क्रिकेट चाहत्यांना लागला आहे.
रचिन रविंद्र याचा कॅच ड्रॉप
जडेजाने कॅच सोडला तेव्हा रचिन 12 धावांवर खेळत होता. आता जडेजाने दिलेल्या जीवनदानाचा रचिन किती फायदा घेतो, याकडे चाहत्याचं लक्ष असेल. तर दुसऱ्या बाजूला टीम इंडियाचा लवकरात लवकर रचिनला रोखून आऊट करण्याचा प्रयत्न असेल. अन्यथा उस्मा मीर याने डेव्हिड वॉर्नर याचा कॅच सोडल्यानंतर सामन्याचा निकाल काय लागला होता, हे सर्व चाहत्यांना माहितच आहे.
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.
न्यूझीलंड प्लेईंग ईलेव्हन | टॉम लॅथम (कॅप्टन आणि विकेटकीपर), डेव्हॉन कॉनवे, विल यंग, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, मिचेल सँटनर, मॅट हेन्री, लॉकी फर्ग्युसन आणि ट्रेन्ट बोल्ट.