रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी पंचांशी घातला वाद! बंगळुरु कसोटीत नेमकं असं काय घडलं?

| Updated on: Oct 19, 2024 | 6:25 PM

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत टीम इंडिया पराभवाच्या सावटाखाली आहे. पण दुसऱ्या डावात टीम इंडियाने जबरदस्त कमबॅक केलं. न्यूझीलंडकडे मोठी आघाडी असून टीम इंडियाने जबरदस्त खेळी करत विजयासाठी 107 धावांचं आव्हान दिलं आहे. पण जेव्हा खेळ टीम इंडियाच्या बाजूने झुकल्याचं दिसत होतं. तेव्हाच खेळ थांबवला.

रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी पंचांशी घातला वाद! बंगळुरु कसोटीत नेमकं असं काय घडलं?
Follow us on

टीम इंडियाचा पहिल्या कसोटी सामन्यात पराभव जवळपास निश्चित आहे. टीम इंडियाने न्यूझीलंडसमोर विजयासाठी अवघ्या 107 धावांचं आव्हान दिलं आहे. न्यूझीलंड हे आव्हान सहज गाठेल असं वाटत आहे. कारण चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा न्यूझीलंडच्या वाटेला फक्त 4 चेंडू आले आणि त्यावर एकही धाव झाली नाही. आता न्यूझीलंडच्या हाती 10 विकेट शिल्लक असून संपूर्ण एक दिवस आहे. त्यामुळे न्यूझीलंडचा विजय हा जवळपास ठरलेला आहे. चौथ्या दिवशी पावसाच्या व्यत्ययामुळे सामना एका तासाआधीच संपवण्याची वेळ आली. त्यामुळे टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली संतापले. त्यांनी पंचांसोबत मैदानात वादही घातला. पण नेमकं असं काय घडलं की वाद घालण्याची वेळ आली. त्याचं कारण असं की, दिवसाचा खेळ संपण्यासाठी एका तासाचा अवधी शिल्लक होता. न्यूझीलंड 107 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला होता. त्याचवेळी नेमके काळे ढग मैदानावर आले. त्यामुळे वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांना चेंडू स्विंग करण्यास मदत मिळू शकली असती.

रोहित शर्माने पहिलंच षटक जसप्रीत बुमराहच्या हाती सोपवलं. या षटकाचे चार चेंडू होताच पंचांनी खेळ थांबवण्याचा निर्णय घेतला. पंचांनी लाइट मीटरच्या माध्यमातून प्रकाशमान तपासलं आणि खेळ थांबवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर न्यूझीलंडचे दोन्ही ओपनर पॅव्हेलियनकडे वेगाने जाऊ लागले. कारण त्यांच्यासाठी ही चांगली बातमी होती. पण टीम इंडियाला ही बाब काही आवडली नाही. त्यानंतर कर्णधार रोहित शर्मा पंच पॉल रायफल आणि मायकल गफ याच्या वाद घालू लागला.

रोहित शर्माने बाजू मांडताना सांगितलं की, पूर्ण षटक तर होऊ द्यायचं होतं ना. इतकंच काय तर प्रकाशाचा अंदाज घेऊन फिरकीपटूंकडून गोलंदाजी करू अशी हमीही त्याने पंचांना दिली. यावेळी रोहित शर्माचा पारा चांगलाच चढलाहोता. विराट कोहलीही या वादात पडला आणि पंचांसमोर बाजू मांडू लागला. संपूर्ण संघाने पंचांना घेरलं पण पंचांनी काही ऐकलं नाही आणि निर्णय कायम ठेवला. टीम इंडिया मैदानात थांबून होती. पण काही वेळातच पाऊस पडला आणि मैदान झाकण्याची वेळ आली.