पुणे | टीम इंडियाने बांगलादेशला गुरुवारी 19 ऑक्टोबरला 7 विकेट्सने पराभूत करत विजयी चौकार लगावला. विराट कोहली याचं शतक, शुबमन गिल याचं अर्धशतक, तसेच रोहित शर्मा, श्रेयस अय्यर आणि केएल राहुल या तिघांनी दिलेल्या योगदानाच्या जोरावर टीम इंडियाने सहज मैदान मारलं. टीम इंडियाकडून विराट कोहली याने नाबाद 103 धावांची शतकी खेळी केली. शुबमन गिल याने 53 आणि कॅप्टन रोहित शर्मा याने 48 धावा केल्या. तर श्रेयस अय्यर याने 19 आणि विकेटकीपर बॅट्समन केएल राहुल याने नाबाद 34 धावांचं योगदान दिलं. टीम इंडियाचा पाचवा सामना हा रविवारी 22 ऑक्टोबर रोजी होणार आहे. टीम इंडियासमोर न्यूझीलंडचं कडवं आव्हान असणार आहे. त्या सामन्याआधी टीम इंडियाला मोठा झटका लागला आहे.
टीम इंडियाचा स्टार ऑलराउंडर आणि उपकर्णधार हार्दिक पंड्या हा दुखापतीमुळे न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यातून बाहेर झाला आहे. हार्दिकला बांगलादेश विरुद्ध बॉलिंग टाकताना त्रास झाला. त्यामुळे हार्दिकला मैदानाबाहेर जावं लागलं. हार्दिकची अपूर्ण ओव्हर विराटने पूर्ण केली. हार्दिकवर त्यानंतर रुग्णालयात आवश्यक उपचार करण्यात आले. त्यानंतर हार्दिक डगआऊटमध्ये दिसला. मात्र तो न्यूझीलंड विरुद्ध खेळणार नसल्याचं बीसीसीआयने दिलेल्या माहितीतून स्पष्ट झालं आहे. बीसीसीआयने तसे संकेत दिले आहेत.
बीसीसीआयने ट्विट करत हार्दिक पंड्या याच्याबाबत मेडिकल अपडेट दिले आहेत. हार्दिकला बांगलादेश विरुद्ध बॉलिंग करताना त्याच्या डाव्या घोट्यला दुखापत झाली. स्कॅन केल्यानंतर हार्दिकला विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. त्याच्यावर बीसीसीआयची मेडिकल टीम लक्ष ठेवून असणार आहे. टीम इंडियाचा न्यूझीलंड विरुद्धचा सामना हा धर्मशाळा इथे आहे. हार्दिक या सामन्यासाठी टीम इंडियासोबत धर्मशाळा इथे गेला नाही. तो थेट लखनऊला जाईल जिथे टीम इंडियाचा 29 नोव्हेबरला इंग्लंड विरुद्ध सामना होणार आहे”, अशी माहिती बीसीसीआयने दिलेली आहे.
हार्दिकबाबत मोठी बातमी
🚨 NEWS 🚨
Medical Update: Hardik Pandya 🔽 #CWC23 | #TeamIndiahttps://t.co/yiCbi3ng8u
— BCCI (@BCCI) October 20, 2023
वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), हार्दिक पांड्या (उपकर्णधार ), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, इशान किशन आणि सूर्यकुमार यादव.
न्यूझीलंड टीम | केन विल्यमसन (कॅप्टन), ट्रेंट बोल्ट, मार्क चॅपमन, डेव्हॉन कॉनवे, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, टॉम लॅथम, डॅरिल मिशेल, जिमी नीशम, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, मिच सँटनर, ईश सोधी, टिम साउथी आणि विल यंग.