टीम इंडिया रोहित शर्माच्या नेतृत्वात बांगलादेशनंतर न्यूझीलंड विरुद्ध मायदेशात कसोटी मालिका खेळण्यासाठी सज्ज आहे. टीम इंडिया या मालिकेत न्यूझीलंड विरुद्ध एकूण 3 सामने खेळणार आहे. न्यूझीलंडला श्रीलंका दौऱ्यात कसोटी मालिका गमावावी लागली. त्यामुळे न्यूझीलंडचं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये पोहचण्याचं स्वप्न भंग झालं. तसेच टीम साऊथीने या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत कर्णधारपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे आता टॉम लॅथम टीम इंडिया विरुद्ध नेतृत्व करणार आहे. लॅथमला कर्णधारपद मिळताच तो एक्शन मोडमध्ये आला आहे. लॅथमने आपल्या सहकाऱ्यांना भारत दौऱ्याआधी कानमंत्र दिला आहे. उभयसंघातील कसोटी मालिकेला 16 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. सलामीचा सामना हा बंगळुरुत होणार आहे. त्यानंतरचे पुढील 2 सामने हे अनुक्रमे पुण आणि मुंबईत आयोजित करण्यात आले आहेत.
“आम्ही जे चांगलं करत होतो, ते तसंच सुरु ठेवायला हवं. भारतात जाणं हे उत्साहपूर्ण आव्हान आहे. आम्ही तिथे जाऊ तेव्हा निर्भिडपणे खेळू अशी आशा आहे. तसेच न घाबरता टीम इंडियाला बॅकफुटवर ढकलण्याचा प्रयत्न करु. आम्ही असं करण्यात यशस्वी ठरलो तर ही आमच्यासाठी एक चांगली संधी असेल. आम्ही पाहिलंय त्यानुसार, ज्या संघांनी भूतकाळात सर्वोत्तम कामगिरी केलीय त्या संघांनी भारतात आक्रमक फलंदाजी केलीय. तिथे भारताला बॅकफुटवर ढकलणं महत्त्वाचं ठरणार आहे. काही होईल याची प्रतिक्षा करण्यात अर्थ नाही. आम्ही तिथे गेल्यावर कसं खेळायचं हे ठरवू. मात्र खेळाडूंनी कसं खेळायचं हे त्यांनी त्यांचं ठरवलंय”,असं लॅथम म्हणाला.
दरम्यान न्यूझीलंडने आतापर्यंत भारतात एकूण 36 कसोटी सामने खेळले आहेत. त्यापैकी न्यूझीलंडला फक्त 2 सामन्यातच विजय मिळवता आला आहे. न्यूझीलंडने 1969 साली नागपूर तर 1988मध्ये मुंबईत विजय मिळवला होता. मात्र त्यानंतर न्यूझीलंडला एकदाही जिंकता आलेलं नाही.
पहिला सामना, 16 ते 20 ऑक्टोबर, बंगळुरु
दुसरा सामना, 24 ते 28 ऑक्टोबर, पुणे
तिसरा सामना, 1 ते 5 नोव्हेंबर, मुंबई
कसोटी मालिकेसाठी न्यूझीलंड टीम : टॉम लॅथम (कॅप्टन), टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), मायकल ब्रेसवेल (पहिल्या कसोटीसाठी), मार्क चॅपमॅन, डेव्हॉन कॉनव्हे, मॅट हेनरी, डॅरल मिचेल, विल ओ रुर्के, एझाज पटेल, ग्लेन फिलिप्स, रचीन रवींद्र, मिचेल सँटनर, बेन सियर्स, इश सोढी (दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटीसाठी), टीम साउथी, केन विलियमसन आणि विल यंग.