भारत आणि न्यूझीलंड कसोटी मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये होत आहे. भारताला यापूर्वी सलग दोन सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. त्यामुळे ही मालिका आधीच हातातून गेली आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यात तर भारतीय फलंदाज न्यूझीलंडच्या फिरकीपुढे नाचताना दिसले. एक एक करत तंबूत परतत होते. त्यामुळे भारतीय खेळाडू ट्रोलर्सच्या निशाण्यावर आले आहेत. पुणे कसोटीत भारताच्या 20 पैकी 18 विकेट या फिरकीपटूंनी घेतल्या. यामुळे भारतीय खेळाडूंचं फिरकी खेळण्याचं कौशल्य कमी झाल्याचं बोललं जात आहे. आता प्रशिक्षक गौतम गंभीर याने या मुद्द्यावर आपलं मत मांडलं आहे. तसेच फलंदाजांचा बचाव करत फिरकीपुढे नापास होण्याचं कारणही सांगून टाकलं आहे.
गौतम गंभीरने सांगितलं की, ‘मी असं अजिबात समजत नाही. कधी कधी विरोधी संघालाही श्रेय दिलं पाहीजे. मिचेल सँटनरने चांगली गोलंदाजी केली. पण आम्हाला कठोर मेहनत घेणं खूपच गरजेचं आहे. आमचे खेळाडू कठोर मेहनत घेत आहेत.’ पुणे कसोटीत टीम इंडियाला फिरकीचा सामना करताना कठीण गेल्याचं दिसून आलं. त्यामुळे 113 धावांनी पराभवाचं तोंड पाहावं लागलं. तिसऱ्या कसोटीत काय होणार अशी धाकधूक टीम इंडियाच्या चाहत्यांना लागून आहे. गंभीरच्या मते टी20 क्रिकेटमुळे बचावात्मक क्रिकेट खेळण्याच्या कलेला तडा गेला आहे. खेळाडूंना आक्रमक खेळण्याची सवय झाली आहे, असं त्याचं म्हणणं आहे.
“कधी कधी आपण चेंडूवर प्रहार करण्याच्या सवयीत इतके गुंतलो आहोत की बचावात्मक खेळण्याची कला विसरून गेलो आहोत. असं 8 ते 10 वर्षापूर्वी झालं होतं. एक संपूर्ण क्रिकेटर चांगला क्रिकेटर असतो. तो टी20 आणि टेस्ट क्रिकेटमध्ये यश संपादन करतो. दोन्ही परिस्थितीत तालमेल बसवतो. ” असं गौतम गंभीरने सांगितलं. ‘यशस्वी कसोटी क्रिकेटर होण्यासाठी विराटसारख्या खेळाडूची गरज आहे. आपण सर्वच महान खेळाडूंबाबत जाणतो, ज्यांनी दीर्घकाळ कसोटीत चांगलं प्रदर्शन केलं आहे. त्यांचा बचावात्मक पवित्रा चांगला होता. कसोटीत आपल्या फलंदाजीचा आधार डिफेंस असणं गरजेचं आहे. तेथून आपण पुढे जातो.’, असंही गौतम गंभीर पुढे म्हणाला.
‘लाल चेंडूने खेळणाऱ्या योग्य खेळाडूंची आम्हाला पारख करणं गरजेचं आहे. कारण चांगला परिणाम मिळवण्यासाठी प्रामाणिकपणे 3 ते 4 किंवा 5 दिवस मेहनत घेणं गरजेचं आहे.’, असंही गौतम गंभीर पुढे म्हणाला.