मुंबई : टीम इंडियासाठी वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धा एकदम खास ठरली आहे. साखळी फेरीतील 9 पैकी 9 सामने जिंकत टीम इंडियाने उपांत्य फेरीत धडक मारली. उपांत्य फेरीत भारताचा सामना न्यूझीलंडशी होत आहे. कर्णधार रोहित शर्माने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. टीम इंडियाने 50 षटकात 4 गडी गमवून 397 धावा केल्या. तसेच विजयासाठी 398 धावांचं आव्हान दिलं. या सामन्यात विराट कोहली याने 113 चेंडूत 117 धावांची खेळी केली. यात 9 चौकार आणि 2 षटकार मारले. विराट कोहलीच्या क्रिकेट कारकिर्दितील हे शतक खास आहे. कारण विराट कोहलीने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्या शतकांचा रेकॉर्ड मोडला आहे. विराट कोहलीने वनडे क्रिकेटमध्ये शतकांचं अर्धशतक ठोकलं आहे. त्यामुळे विराट कोहलीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
सचिन तेंडुलकरने आपल्या क्रिकेट कारकिर्दित 463 वनडे सामने खेळले आहेत. त्यात 452 डावात 44.83 च्या सरासरीने 18426 धावा केल्या. यात एकूण 49 शतकं ठोकली आहेत. दुसरीकडे, विराट कोहली याने 279 वनडे डावात ही उंची गाठली आहे. शतकांचं अर्धशतक झळकावताच त्याने मैदानात आनंद साजरा केला. शतक झळकावल्यानंतर स्टँडमध्ये बसलेल्या सचिन तेंडुलकरला दोन्ही हात वरून कमरेतून वाकून नमस्कार केला.
सचिन तेंडुलकरला नमन केल्यानंतर पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा हिला फ्लाइंग किस केलं. इतकंच काय तर अनुष्काने तशीच प्रतिक्रिया दिली. विराट कोहलीची ही रिएक्शन सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
विराट कोहली याने 279 डावात 50 शतक, सचिन तेंडुलकरने 452 डावात 49 शतकं, रोहित शर्माने 251 डावात 31 शतकं, रिकी पॉन्टिंगने 365 डावात 30 शतकं, सनथ जयसूर्याने 433 डावात 28 शतकं ठोकली आहेत.