कोलंबो | कॅप्टन रोहित शर्मा याच्या नेतृत्वात टीम इंडिया शनिवारी 2 सप्टेंबर रोजी पाकिस्तान विरुद्ध 2 हात करण्यासाठी सज्ज झाली आहे. आशिया कप 2023 मधील हा तिसरा सामना आहे. पाकिस्तानने या हायव्होल्टेज सामन्यासाठी काही तासांआधीच प्लेईंग इलेव्हन जाहीर केली आहे. बाबर आझम पाकिस्तानचं कॅप्टन्सी करणार आहे. तर शादाब खान याच्याकडे उपकर्णधारपदाची सूत्रं देण्यात आहेत. आगामी आयसीसी वनडे वर्ल्ड कपआधी होणाऱ्या या सर्वात मोठ्या सामन्यासाठी क्रिकेट विश्व तयार आहे.
टीम इंडिया-पाकिस्तान वनडे क्रिकेटमध्ये 4 वर्षांनी एकमेकांसमोर खेळायला उतरणार आहेत. याआधी टीम इंडिया-पाकिस्तान कट्टर प्रतिस्पर्धी आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2019 मध्ये आमनेसामने भिडले होते. हा सामना मँचेस्टरमध्ये आयोजित करण्यात आला होता. तेव्हा टीम इंडियाने पाकिस्तानला पराभवाची धुळ चारली होती.
आगामी वर्ल्ड कपआधी आशिया खंडातील 6 पैकी 5 संघांसाठी आशिया कप स्पर्धा महत्त्वाची आहे. त्यामुळे वर्ल्ड कपसाठी आशिया कप स्पर्धेतून टीम इंडिया, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या 5 संघाचा जोरदार सराव होणार आहे. त्यामुळे टीम इंडिया आशिया कपच्या माध्यमातून वर्ल्ड कपच्या दृष्टीने जोरदार तयारी करण्याच्या उद्देशाने मैदानात उतरेल.
दरम्यान टीम इंडिया-पाकिस्तान आशिया कपमध्ये एकूण 13 वेळा एकमेकांविरुद्ध खेळले आहेत. टीम इंडियाने पाकिस्तान विरुद्ध 13 पैकी 7 वनडे सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर पाकिस्तान 5 सामन्यात विजयी झाला आहे. मात्र 1 सामन्याचा निकाल लागू शकला नाही. त्यामुळे आकड्यांच्या बाबतीत टीम इंडियाच सरस आहे. त्यामुळे आता शनिवारी होणाऱ्या सामन्यात कोण जिंकत याकडे साऱ्यांचंच लक्ष आहे.
पाकिस्तान प्लेईंग इलेव्हन | बाबर आजम (कॅप्टन), शादाब खान (उप कर्णधार), फखर जमान, इमाम उल हक, मोहम्मद रिजवान, इफ्तिखार अहमद, सलमान अगहा, मोहम्मद नवाझ, शाहीन अफ्रीदी, नसीम शाह आणि हारिस रऊफ.
आशिया कप 2023 साठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, ईशान किशन, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, कुलदीप यादव जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा आणि संजू सॅमसन (राखीव विकेटकीपर).