कोलंबो | आशिया कप 2023 स्पर्धेची सुरुवात 30 ऑगस्टपासून झाली. या स्पर्धेतील पहिला सामना हा पाकिस्तानने 238 धावांनी जिंकला. पाकिस्तानचा हा वनडे क्रिकेटमधील तिसरा सर्वात मोठा विजय ठरला. पाकिस्तानने नेपाळला विजयासाठी 343 धावांचं आव्हान दिलं होतं, पण नेपाळ 104 धावांवरच ऑलआऊट झाली. पाकिस्ताने आशिया कपमध्ये विजयी सुरुवात केली. पाकिस्तानला आता सुपर 4 मध्ये पोहचण्यासाठी एका सामन्यापासून दूर आहे. पाकिस्तानचा पुढील सामना हा टीम इंडिया विरुद्ध होणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही टीम आणि दोन्ही देश उत्सुक आहेत.
या सामन्यात चांगलीच चुरस पाहायला मिळणार आहे.
टीम इंडियाचे बरेचसे खेळाडू हे पाकिस्तान विरुद्ध पहिल्यांदाच खेळणार आहेत. यामध्ये टीम इंडियाच्या तब्बल 4 खेळाडूंचा समावेश असणार आहे. या चौघांमध्ये शुबमन गिल, श्रेयस अय्यर, विकेटकीपर बॅट्समन इशान किशन आणि मोहम्मद सिराज हे आहेत. या चौघांना पाकिस्तान विरुद्ध टीम इंडिया प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी मिळणार असल्याचं निश्चित मानलं जात आहे. तसेच सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा या दोघांनाही संधी मिळाली तर, त्यांचीही पाकिस्तान विरुद्धची पहिलीच वेळ ठरेल.
टीम इंडिया-पाकिस्तान यांच्यात आशिया कप 2023 मध्ये 2 सप्टेंबरला सामना होणार आहे. हे दोन्ही पारंपरिक प्रतिस्पर्धी 4 वर्षांनंतर पुन्हा एकदा आमनेसामने असणार आहेत. याआधी वनडे वर्ल्ड कप 2019 मध्ये हे चीर प्रतिद्वंदी भिडले होते. तेव्हा टीम इंडियाने विजय मिळवला होता. त्यानंतर आता पुन्हा या सामन्याची क्रिकेट चाहत्यांना प्रतिक्षा आहे.
दरम्यान आशिया कप स्पर्धेत टीम इंडिया-पाकिस्तान दोन्ही संघांचा तब्बल 3 वेळा आमनासामना होण्याची शक्यता आहे. टीम इंडिया आणि पाकिस्तान दोन्ही संघ जर फायनलमध्ये पोहचले, तर 3 वेळा सामना होईल.
आशिया कप 2023 साठी अशी आहे टीम इंडिया | रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, ईशान किशन, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, कुलदीप यादव जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा आणि संजू सॅमसन (राखीव विकेटकीपर).
आशिया कपसाठी पाकिस्तान क्रिकेट टीम | बाबर आझम (कॅप्टन), शादाब खान (उपकर्णधार), अब्दुल्ला शफीक, फखर जमान, इमाम-उल-हक, सलमान अली आगा, इफ्तिखार अहमद, तय्यब ताहिर, सौद शकील (फक्त अफगाणिस्तान मालिकेसाठी), मोहम्मद रिझवान, मोहम्मद हारिस, मोहम्मद नवाज, उसामा मीर, फहीम अश्रफ, हरिस रौफ, मोहम्मद वसीम जूनियर, नसीम शाह आणि शाहीन आफ्रिदी.