अहमदाबाद | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मध्ये आतापर्यंत अनेक शानदार सामने झालेत. मात्र क्रिकेट चाहत्यांना प्रतिक्षा आहे ती टीम इंडिया-पाकिस्तान सामन्याची. हा महामकाबुला 14 ऑक्टोबरला होणार आहे. या महामुकाबल्याला अवघे काही तासच बाकी राहिले आहेत. नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये सामना होणार आहे. या सामन्यासाठी कडेकोट सुरक्षा असणार आहे. सामन्यासाठी सर्व नियोजन झालेलं आहे. रोहित शर्मा टीम इंडियाचं आणि बाबर आझम पाकिस्तानचं नेतृत्व करणार आहे. दोन्ही संघांनी वर्ल्ड कपमधील दोन्ही सामने जिंकले आहेत. त्यामुळे दोन्ही संघांचा प्रयत्न विजयी घोडदौड कायम राखण्याचा प्रयत्न असणार आहे.
टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान या दोघांना पराभूत केलं. तर पाकिस्तानने नेदरलँड्स आणि श्रीलंकेवर विजय मिळवला. त्यामुळे दोन्ही संघांमधील सामना हा रोमांचक होणार आहे. या सामन्यानिमित्ताने टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान एकूण किती वेळा आमनेसामने आले आहेत, दोघांपैकी सर्वाधिक सामने कुणी जिंकले आहेत हे आपण जाणून घेऊयात.
टीम इंडिया-पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत 134 वेळा आमनासामना झाला आहे. यामध्ये पाकिस्तान टीम इंडियावर वरचढ राहिली आहे. पाकिस्तानने 73 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर टीम इंडियाला 53 वेळा विजय मिळवता आला आहे. तर 5 सामन्यांचा निकाल लागला नाही. तर दोन्ही संघांमध्ये 17 एकदिवसीय मालिका पार पडल्या आहेत. यापैकी 11 मालिकेत टीम इंडियाने विजय मिळवला आहे. तर पाकिस्तानने 5 सीरिज जिंकल्या आहेत. तर एक मालिका बरोबरीत राहिली आहे.
टीम इंडिया-पाकिस्तान आतापर्यंत वनडे वर्ल्ड कपमध्ये 7 वेळा एकमेकांसमोर आले आहेत. यामध्ये टीम इंडियाचाच दबदबा राहिला आहे. टीम इंडियाने 7 पैकी 7 सामने जिंकले आहेत. त्यामुळे टीम इंडिया आतापर्यंत वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानवर वरचढ राहिली आहे. त्यामुळे टीम इंडिया हा 7 आकडा 8 करण्याच्या तयारीत आहे.
वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), हार्दिक पांड्या (उपकर्णधार ), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, इशान किशन आणि सूर्यकुमार यादव.
पाकिस्तान क्रिकेट टीम | बाबर आझम (कॅप्टन), शादाब खान, फखर जमान, इमाम उल हक, अब्दुल्ला शफीक, मोहम्मद रिझवान, सौद शकील, इफ्तिखार अहमद, सलमान अली आगा, मोहम्मद नवाज, उसामा मीर, हरिस रौफ, हसन अली, शाहीन आफ्रिदी आणि मोहम्मद वसीम.