मुंबई : आशिया कप 2023 स्पर्धेचा पावसाच्या व्यत्ययामुळे खेळखंडोबा झाला आहे. आशिया कप स्पर्धेतील साखळी फेरीत रंगलेला भारत पाकिस्तान सामना पावसामुळे वाया गेला. त्यानंतर सुपर 4 फेरीतील सामना तरी व्यवस्थित होईल अशी आशा होती. पण या सामन्यातही पावसाने हजेरी लावली आणि हिरमोड झाला. या सामन्यासाठी राखीव दिवस ठेवल्याने आता हा सामना थांबला तेथून 11 सप्टेंबरला सुरु होणार आहे. पण या दिवशी पाऊस असेल की नसेल. सामाना होईल की नाही? असे अनेक प्रश्न क्रीडाप्रेमींना पडले आहेत. श्रीलंकेतील प्रेमदासा मैदानात राखीव दिवशी कसं असेल हवामान याबाबत जाणून घेऊयात.
भारत पाकिस्तान सामन्याच्या राखीव दिवसावरही पावसाचं सावट आहे. त्यामुळे हा सामना पूर्ण होईल अशी शक्यता कमीच आहे. Accuweather च्या अंदाजानुसार, राखीव दिवशी पाऊस होईल 99 टक्के शक्यता आहे. त्यामुळे हा सामना होणं अशक्य असं म्हंटलं तर हरकत नाही. दिवसभर आभाळ दाटलेलं राहील. त्याचबरोबर वाऱ्याचा वेग 41 किमी प्रतितास इतका असेल. कमाल तापमान 29 डिग्री सेल्सियस, तर किमान तापमान 25 डिग्री सेल्सियस असेल.
पाऊस सुरु राहिला तर डकवर्थ लुईस नियमानुसार पाकिस्तानला 20 षटकात 181 धावांचं आव्हान दिलं जाईल.पण पाऊस सुरुच राहिला तर मात्र सामना रद्द करण्याशिवाय पर्याय उरणार नाही. अशात दोन्ही संघांना सुपर फोर फेरीत प्रत्येकी एक गुण दिला जाईल. त्यामुळे भारताला बांगलादेश विरुद्धचा सामना काहीही करून जिंकावाच लागणार आहे.
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, इशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.
पाकिस्तान प्लेईंग ईलेव्हन | बाबर आझम (कर्णधार), फखर जमान, इमाम-उल-हक, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), आगा सलमान, इफ्तिखार अहमद, शादाब खान, फहीम अश्रफ, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह आणि हरिस रउफ.