कोलंबो | टीम इंडियाने आशिया कप सुपर 4 मधील चौथ्या सामन्यात 12 सप्टेंबरला श्रीलंकेवर 41 धावांनी विजय मिळवला. टीम इंडियाने श्रीलंकेला विजयासाठी 214 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र श्रीलंका 41.3 ओव्हरमध्ये 172 धावांवर ऑलआऊट झाली. टीम इंडियाने विजयासह आशिया कप 2023 फायनलमध्ये एन्ट्री केली. टीम इंडियाची आशिया कप स्पर्धेच्या इतिहासात अंतिम फेरीत पोहचण्याची ही दहावी वेळ ठरली आहे. आता टीम इंडिया रविवारी 17 सप्टेंबरला अंतिम सामना खेळणार आहे. आशिया कप 2023 मधील फायनल सामना टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान असा होऊ शकतो.
टीम इंडियाच्या श्रीलंका विरुद्धच्या या विजयामुळे बांगलादेशचा सुपर 4 मधून पत्ता कट झाला. तर आता फायनलमधील एका जागेसाठी श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यात काँटे की टक्कर पाहायला मिळणार आहे. पाकिस्तान-श्रीलंका यांच्यातील अटीतटीचा सामना हा 14 सप्टेंबरला होणार आहे.
दोन्ही संघांनी सुपर 4 मध्ये प्रत्येकी 2 सामने खेळले आहेत. दोघांनी 1 सामना जिंकलाय आणि 1 गमावलाय. त्यामुळे दोघांच्या खात्यात 2 पॉइंट्स आहेत. त्यामुळे दोन्ही संघांना अंतिम फेरीत पोहचण्याची समसमान संधी आहे. आता या सामन्यात जो जिंकेल तो फायनलमध्ये टीम इंडिया विरुद्ध भिडेल. पाकिस्तानने हा सामना जिंकल्यास क्रिकेट चाहत्यांना पुन्हा एकदा हायव्होल्टेज सामना पाहायला मिळू शकतो. मात्र अंतिम सामना टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यात होणार की नाही, हे 14 सप्टेंबरला होणाऱ्या सामन्याच्या निकालावर अवलंबून असणार आहे.
आशिया कपसाठी श्रीलंका क्रिकेट टीम | दासुन शनाका (कॅप्टन), कुसल मेंडिस (उपकर्णधार), पाथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, कुसल जेनिथ परेरा, चरिथ असलंका, धनंजया डी सिल्वा, सदीरा समरविक्रमा, महेश थिक्षाना, दुनिथ वेललागे, मथीशा पाथिराना, कसून राजिथा, दुशन हेमंथा, बिनुरा फर्नांडो आणि प्रमोद मधुशन.
पाकिस्तान क्रिकेट टीम | बाबर आझम (कर्णधार), शादाब खान (उपकर्णधार), अब्दुल्ला शफीक, फखर जमान, इमाम-उल-हक, सलमान अली आगा, इफ्तिखार अहमद, तय्यब ताहिर, सौद शकील, मोहम्मद रिझवान, मोहम्मद हारिस, मोहम्मद नवाज, उसामा मीर, फहीम अश्रफ, हरिस रौफ, मोहम्मद वसीम जूनियर, नसीम शाह आणि शाहीन आफ्रिदी.