मुंबई : वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील भारत पाकिस्तान सामना एकतर्फी झाला. दोन्ही संघात तुल्यबल लढत होईल अशी आशा होती. पण भारताने पाकिस्तानला चीतपट करून टाकलं. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर भारताने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानने फलंदाजीला येत आश्वासक सुरुवात केली. त्यामुळे पाकिस्तान आरामात 270 ते 300 धावा करेल असा अंदाज होता. मात्र सर्व गणित मधल्या फळीत फिस्कटून गेलं. एकापाठोपाठ एक गडी तंबूत परतले. त्यामुळे पाकिस्तानचा डाव 191 धावांवरच आटोपला. भारताला विजयासाठी दिलेलं लक्ष्य एकदम सोपं होतं. त्यामुळे भारताचा विजय पहिल्या डावानंतरच निश्चित झाला होता. भारताने तीन गडी गमवून 30.3 षटकात हे आव्हान पूर्ण केलं. या पराभवानंतर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याने आपलं मत स्पष्ट केलं आहे.
“आम्ही चांगली सुरुवात केली. माझ्यात आणि इमाममध्ये चांगली भागीदारी झाली होती. मला आणि रिझवानला नेहमीप्रमाणे क्रिकेट खेळायचे होते. अचानक आम्ही कोलमडलो आणि पुन्हा सावरलोच नाहीत. आम्ही ज्या पद्धतीने सुरुवात केली, तेव्हा आम्हाला वाटलं की 280-290 धावा करू. पण दुर्दैवाने तसं झालं नाही. रोहित ज्या प्रकारे खेळत आहे. खरंच त्याचं कौतुक करावं तितकं कमीच आहे.”, असं बाबर आझम म्हणाला.
पाकिस्तानने सुरुवातील दुबळ्या संघांसोबत विजय मिळवला आहे. त्यामुळे पुढे आणखी कठीण संघ असणार आहेत. त्यात विजयी मिळवून उपांत्य फेरीच्या लढतीत कायम राहणं ही मोठी परीक्षा आहे. एखाद दोन मोठ्या फरकाने पराभव झाले तर मात्र साखळी फेरीतच गाशा गुंडाळावा लागेल.
भारताने पाकिस्तानला मोठ्या फरकाने पराभूत केल्याने गुणतालिकेत जबरदस्त फायदा झाला आहे. टीम इंडियाने अव्वल स्थानी झेप घेतली आहे.भारताचा पुढचा सामना बांगलादेशसोबत 19 ऑक्टोबरला आहे. त्यानंतर 22 ऑक्टोबरला न्यूझीलंडशी लढत होईल. इंग्लंडसोबत 29 ऑक्टोबर, श्रीलंकेशी 2 नोव्हेंबर, दक्षिण आफ्रिकेशी 5 नोव्हेंबर आणि नेदरलँडशी 12 नोव्हेंबरला सामना होणार आहे.
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज
पाकिस्तान प्लेइंग ईलेव्हन | बाबर आझम (कर्णधार), अब्दुल्ला शफीक, इमाम-उल-हक, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), सौद शकील, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, हसन अली, शाहीन आफ्रिदी आणि हरिस रौफ.