मुंबई : 19 वर्षाखालील आशिया कप स्पर्धा दुबईत खेळली जात आहे. रविवारी भारत आणि पाकिस्तान हे पारंपरिक प्रतिस्पर्धी आमनेसामने आले होते. हा सामना पाकिस्तानने जिंकला आणि भारतीय संघाला पराभवाचं तोंड पाहावं लागलं. भारताने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ९ गडी गमवून २५९ धावा केल्या होत्या. विजयासाठी २६० धावांचं आव्हान दिलं होतं. पण या धावा भारतीय गोलंदाजांना रोखता आल्या नाहीत. भारताला ८ गडी राखून पाकिस्तानने पराभूत केलं. भारताकडून तीन फलंदाजांनी अर्धशतकी खेळी केली. पण ही व्यर्थ गेली असंच म्हणावं लागेल. या सामन्यात भारतीय संघ फलंदाजी करत असताना विचित्र प्रकार घडला. आदर्श सिंह दुर्दैव म्हणा की विकेटकीपर साद बेगचं नशिब यापैकी काही एक म्हणू शकता. कारण विकेटकीपर साद बेगनं हाताने नाही तर पायाने झेल पकडला आणि आदर्श सिंहला तंबूचा रस्ता दाखवला.
भारतीय संघ फलंदाजी करताना ३२ वं षटक सुरु होतं. हे षटक अराफत मिन्हास टाकत होता. यावेळी मैदानात उदय शरण आणि आदर्श सिंह यांची जोडी जमली होती. ही जोडी पाकिस्तानसाठी डोकेदुखी ठरली होती. पण अराफतने विकेटकीपर सादच्या मदतीने ही जोडी फोडली. अराफतने स्टम्पच्या बाहेर चेंडू टाकला. डावखुऱ्या आदर्श सिंह स्विपच्या प्रयत्नात गेला. पण चेंडू पूर्णपणे बॅटवर आला नाही आणि कट लागून विकेटकीपरच्या दिशेने गेला. चेंडू ग्लोव्ह्जला लागून खाली पडणार तितक्यात त्याने हा चेंडू पायामध्ये पकडला. चेंडू आरामात बसल्याने गोलंदाजाने लागलीच अपील केली आणि पंचांनी त्याला बाद दिलं.
It's all about catching the ball – it doesn't matter how you do it 😄 (courtesy ACC) #Cricket #U19AsiaCup pic.twitter.com/lnLR3pJN9e
— Saj Sadiq (@SajSadiqCricket) December 10, 2023
भारताकडून आदर्श सिंहने ६२, उदय शरणने ६० आणि सचिन दासने ५८ धावांची खेळी केली. पण या तिन्ही अर्धशतकी खेळींवर अजान आवेसचं एक शतक भारी पडला. त्याने १३० चेंडूत १०५ धावा केल्या. यात १० चौकारांचा समावेश आहे. दुसरीकडे, शाजैब खान याने ६३ धावा केल्या. त्यात कर्णधार साद बेगने अर्धशतक ठोकलं. नाबाद ५१ चेंडूत ६८ धावा केल्या. पाकिस्तानने ४७ षटकात २ गडी गमवून हे लक्ष गाठलं.