भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात टी20 वर्ल्डकप जेतेपदासाठी लढत होणार आहे. त्यामुळे दोन्ही संघाचे चाहते आपलाच संघ विजयी होणार याबाबत ठामपणे सांगत आहे. असं असताना टीम इंडियाला एक वेगळीच चिंता सतावत आहे. ती म्हणजे विराट कोहलीच्या फॉर्मची..विराट कोहली टी20 वर्ल्डकपसाठी अमेरिकेत उशिराने पोहोचला होता. त्यामुळे त्या सराव शिबिरात भाग घेता आला नाही. त्यानंतर थेट आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात मैदानात उतरला. पण तेथून पुढे विराट कोहली फॉर्मसाठी झुंजताना दिसला. आतापर्यंत खेळलेल्या सातही सामन्यात फेल गेला आहे. दोन सामन्यात तर त्याला आपलं खातंही खोलता आलं नाही. त्यामुळे विराट कोहलीच्या फॉर्मची चिंता सतावत आहे. अंतिम फेरीत त्याच्याकडून अपेक्षा आहेत मात्र मागचा फॉर्म पाहता चाहत्यांची धाकधूक वाढली आहे. असं असताना इंग्लंडचा माजी फिरकीपटू मॉन्टी पानेसरने विराट कोहलीबाबत मोठं विधान केलं आहे. “भारत वर्ल्डकप जिंकेल आणि विराट कोहली शतक ठोकेल.”, असं मॉन्टी पानेसरने एएनआयशी बोलताना सांगितलं.
“विराट कोहली क्वॉलिटी प्लेयर आहे. या प्रसंगातून कोणीही जाऊ शकतं. त्याच्या क्लासबाबत जाणून आहोत. मोठ्या सामन्यात त्याचं महत्त्व आपल्याला माहिती आहे. त्यामुळे फॉर्मची कोणतीच चिंता नाही. त्याचा हेतू स्पष्टपणे दिसत आहे. तो अंतिम सामन्यात नक्कीच चांगलं करेल.”, असं कर्णधार रोहित शर्माने सामन्यानंतर सांगेन. त्यामुळे अंतिम फेरीतही विराट कोहली रोहित शर्मासोबत ओपनिंगला उतरेल यात शंका नाही. त्यामुळे प्लेइंग इलेव्हनमध्ये काहीच बदल होणार नाही. आता मॉन्टी पानेसरचं विधान खरं ठरतं का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
विराट कोहली आयपीएल 2024 स्पर्धेत ऑरेंज कॅपचा मानकरी ठरला होता. त्याने 61.75 च्या सरासरीने 741 धाव केल्या. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट हा 154.69 इतका होता. यात त्याने एक शतक आणि पाच अर्धशतकं ठोकली होती. पण टी20 वर्ल्डकप स्पर्धेत त्याला नशिबाची साथ मिळाली नाही. त्याने आतापर्यंत खेळलेल्या सात सामन्यात फक्त 75 धावा केल्या आहेत. यात दोन वेळा शून्यावर बाद झाला आहे.