सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात टीम इंडिया दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर आहे. चार सामन्यांची टी20 मालिका भारतीय संघ खेळणार आहे. या सामन्यातील पहिला सामना 8 नोव्हेंबरला डरबनमध्ये खेळला जाणार आहे. या मालिकेतून यश दयाल, विजयकुमार विशाक आणि रमणदीप सिंग आंतरराष्ट्रीय पातळीवर पदार्पण करण्याची शक्यता आहे. पहिल्या सामन्यातून दोन्ही संघांचा विजयाचा मानस असणार यात शंका नाही. त्यामुळे खेळपट्टीचा अंदाज घेऊनच कौल घेतला जाईल. डरबनची खेळपट्टी ही मोठी धावसंख्या होईल अशीच आहे. पहिल्या डावातील सरासरी धावा या 153 आहेत. तर दुसऱ्या डावातील धावांची सरासरी ही 135 आहे. या मैदानावर आतापर्यंत 18 आंतरराष्ट्रीय सामने झाले आहेत. यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने 9 वेळा विजय मिळवला आहे. तर धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाने 8 वेळा विजय मिळवला आहे. एक सामना निकालाविना संपला आहे. डरबनमध्ये आधीच पाऊस पडला असून खेळपट्टी ओलसर असणार आहे. त्यामुळे वेगवान गोलंदाजाना सुरुवातीला फायदा होईल. गोलंदाजीसाठी अनुकूल परिस्थिती असूनही तग धरून फलंदाजी केल्यास मोठी धावसंख्या होऊ शकते. त्यामुळे नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजीला प्राधान्य दिलं जाईल.
तसं पाहिलं तर डरबनच्या खेळपट्टीचा अंदाज बांधणं खूपच कठीण आहे. मागच्या वर्षी ऑस्ट्रेलियाने 191 धावांचा यशस्वीरित्या पाठलाग केला होता. दुसरीकडे, या मैदानावर भारताने फक्त एकच टी20 सामना खेळला आहे. 17 वर्षांपूर्वी झालेल्या या सामन्यात टीम इंडियाने दक्षिण अफ्रिकेचा 37 धावांनी पराभव केलेला. या सामन्यात रोहित शर्माने अर्धशतकी खेळी केली होती. तसेच आरपी सिंगने 4 षटकात 13 धावा देत 4 गडी बाद केले होते.
भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात आतापर्यंत 27 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. भारताने 15 सान्यात विजय मिळवला आहे. तर 11 सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. उभय देशात शेवटचा टी20 सामना वर्ल्डकपमध्ये 29 जून 2024 रोजी खेळला गेला. अतितटीच्या या सामन्यात भारताने विजय मिळवला आणि जेतेपदावर नाव कोरलं होतं. दुसरीकडे, भारताने दक्षिण अफ्रिकेत दक्षिण अफ्रिकेविरुद्ध 10 सामने खेळले आहेत. यात सहा सामन्यात भारताने, तर तीन सामन्यात दक्षिण अफ्रिकेने विजय मिळवला आहे. तर डरबनमध्ये झालेला एक सामना पावसामुळे ड्रॉ झाला होता.