मुंबई : भारत विरुद्ध दक्षिण अफ्रिका यांच्यात तीन सामन्यांची टी20 मालिका 10 डिसेंबरपासून सुरु होणार आहे. टी20 वर्ल्डकप 2024 पूर्वी ही मालिका भारतासाठी महत्त्वाची आहे. या मालिकेतून खेळाडूंची चाचपणी करता येणार आहे. सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात दुसऱ्यांदा टीम इंडिया मालिका खेळणार आहे. यापूर्वी ऑस्ट्रेलिया विरुद्धची मालिका टीम इंडियाने 4-1 ने जिंकली होती. आता विदेशी धरतीवर सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे. टीम इंडिया आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात आतापर्यंत 24 आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेल आहेत. यात भारताने 13 तर दक्षिण अफ्रिकेने 10 सामन्यात विजय मिळवला आहे. तर एक सामना अनिर्णित ठरला आहे. तर दक्षिण अफ्रिकेत खेळल्या गेलेल्या 7 पैकी 5 सामन्यात टीम इंडियाने विजय मिळवला आहे. त्यामुळे आकडेवारी पाहता टी20 मालिकेत टीम इंडियाचा वरचष्मा दिसत आहे. पण या मालिकेत सूर्यकुमार यादव याची डोकेदुखी वाढली आहे. ओपनिंगला कोण उतरणार? असा प्रश्न पडला आहे.
ओपनिंगसाठी ऋतुराज गायकवाड, शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, इशान किशन ही चार नावं आहेत. पण यापैकी कोणती जोडी मैदानात उतरेल याबाबत संभ्रम आहे. दुसरीकडे, कर्णधार सूर्यकुमार यादव यानेही ही चांगली डोकेदुखी असल्याचं सांगितलं आहे. “ही काय समस्या नाही. हे चांगलंच आहे. कर्णधार आणि प्रशिक्षकासाठी ही चांगली बाब आहे. इतके सर्व टॅलेंटेड लोकं एकत्र आले आहेत. माहिती नाही बाहेरचं कसं चालत आहे. पण ही डोकेदुखी खूपच चांगली आहे. मॅनेजमेंटकडे यादी घेऊन बसू आणि त्यात ठरवू. याबाबतचा निर्णय तसा घेतला आहे. पण खेळाडूंना थोडी आणखी प्रॅक्टिस करू दे.” असं सूर्यकुमार यादव याने सांगितलं.
“टी20 वर्ल्डकप 2024 पूर्वी फक्त सहा मालिका आहेत. पण आम्ही आयपीएलही खेळणार आहोत. त्यामुळे खेळाडूंची निवड करताना काही अडचण येणार नाही. प्रत्येकाला त्याचा रोल माहिती आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्धचा आमचा अनुभव चांगला राहिला आहे. त्यामुळे खेळाडूंना स्फुरण मिळालं आहे. “, असं टी20 वर्ल्डकपबाबत विचारलेल्या प्रश्नाला सूर्यकुमार यादवने उत्तर दिलं.
टीम इंडिया : ऋतुराज गायकवाड, रिंकू सिंह, श्रेयस अय्यर, शुबमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, यशस्वी जयस्वाल, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, इशान किशन (विकेटकीपर), जितेश शर्मा (विकेटकीपर), अर्शदीप सिंग, दीपक चाहरर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, रवि बिश्नोई.
दक्षिण अफ्रिका : डेविड मिलर, रीजा हेंड्रिक, ट्रिस्टन स्टब्स,एडन मार्करम (कर्णधार), अँडिले फेहलूक्वायो, मार्को यानसेन, डोनोवन फेरेरा, हेन्रिच क्लासेन, मॅथ्यू ब्रीत्झक, बुइरेन हेंड्रिक, गेराल्ड कोएत्झी, केशव महाराज, लिझाड विल्यम्स, लुंगी एनगिडी, नांद्रे बर्गर, ओटनिल बार्टमॅन, तबरेज शस्मी