IND Vs SA | कॅप्टन रोहित शर्मा दक्षिण आफ्रिकेत इतिहास बदलणार? कसोटी मालिकेत मोठं आव्हान

| Updated on: Dec 01, 2023 | 9:16 PM

India Tour Of South Africa | रोहित शर्मा दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या टी 20 आणि वनडे सीरिजमध्ये खेळणार नाही. मात्र कसोटी मालिकेत हिटमॅन टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे.

IND Vs SA | कॅप्टन रोहित शर्मा दक्षिण आफ्रिकेत इतिहास बदलणार? कसोटी मालिकेत मोठं आव्हान
Follow us on

मुंबई | टीम इंडिया- ऑस्ट्रेलिया यांच्यात सध्या टी 20 मालिका खेळवण्यात येत आहे. या मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना हा 3 डिसेंबरला होणार आहे. त्यानंतर टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार आहे. टीम इंडिया दक्षिण आफ्रिके विरुद्ध टी 20, वनडे आणि टेस्ट सीरिज खेळणार आहे. या तिन्ही मालिकेसाठी बीसीसीआय निवड समितीने टीम इंडियाची 30 नोव्हेंबर रोजी घोषणा केली आहे. टीम इंडियाचं तिन्ही फॉर्मेटमध्ये 3 वेगवेगळे कर्णधार असणार आहेत.

टी 20 मालिकेत हार्दिक पंड्या याला दुखापत असल्याने सूर्यकुमार यादव याच्या गळ्यात कर्णधारपदाची माळ पडली आहे. रोहित शर्मा याने विश्रांती मागितल्याने केएल राहुल याला कॅप्टन केलं आहे. तर रोहित शर्मा हाच कसोटी मालिकेत नेतृत्व करणार आहे. कॅप्टन रोहितसाठी कसोटी मालिका आव्हानात्मक असणार आहे. तसेच कॅप्टन म्हणून रोहित शर्माला इतिहास बदलण्याची संधी आहे.

टीम इंडियाला आतापर्यंत एकदाही दक्षिण आफ्रिकेत एकदाही कसोटी मालिका जिंकता आलेली नाही. टीम इंडिया याआधी 2021-2022 मध्ये दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेली होती. तेव्हा उभयसंघात 3 सामन्यांची मालिका खेळवण्यात आली होती. टीम इंडिया पहिला सामना जिंकत विजयी सलामी दिली. टीम इंडियाने 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. मात्र त्यानंतर दक्षिण आफ्रिकेने सलग 2 सामने जिंकून मालिका जिंकली.

टीम इंडियाची दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिकेतील आकडेवारी फार वाईट राहिली आहे. टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेत 1992 मध्ये पहिल्यांदा कसोटी मालिका खेळली. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेत आतापर्यंत एकूण 23 कसोटी सामने खेळले आहेत. त्यापैकी फक्त 4 सामन्यातच टीम इंडियाला विजय मिळवण्यात यश आलं आहे. तर आफ्रिकेने 12 सामन्यांमध्ये टीम इंडियावर मात केली आहे. मात्र आतापर्यंत टीम इंडियाच्या एकाही कॅप्टनला दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिकेत विजयी करता आलेलं नाही. त्यामुळे कॅप्टन रोहित हे आव्हान कशाप्रकारे पेलतो याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋतुराज गायकवाड, इशान किशन (विकेटकीपर), केएल राहुल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, मोहम्मद. शमी (फिटनेसवर अवलंबून) आणि प्रसीध कृष्णा.

टेस्ट सीरिजचं वेळापत्रक

पहिला सामना, 26 ते 30 डिसेंबर, सेंचुरियन.

दूसरा सामना, 3 ते 7 जानेवारी, केपटाउन.