गुवाहाटी : टीम इंडियाने (Indian Cricket Team) पहिल्या एकदिवसीय सामन्यात विजयी सलामी दिली आहे. टीम इंडियाने रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वात श्रीलंकेवर 67 धावांनी विजय मिळवला आहे. भारताने विजयासाठी श्रीलंकेला 374 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र श्रीलंकेला 50 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 306 धावाच करता आल्या. भारताने या विजयासह 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. (ind vs sl 1st odi team india win by 67 runs against sri lanka at guwahati virat kohli and umran malik)
श्रीलंकेकडून कर्णधार दासून शनाकाने सर्वाधिक नाबाद 108 धावांची खेळी केली. मात्र त्याला श्रीलंकेला विजय मिळवून देता आला नाही. दासून व्यतिरिक्त ओपनर पाथुम निसांकाने 72 धावा केल्या. तर धनंजया डिसीलव्हाने 47 रन्स केल्या. या व्यतिरिक्त भारतीय गोलंदाजांनी लंकेच्या फलंदाजांना स्वस्तात माघारी पाठवलं. टीम इंडियाकडून जम्मू एक्सप्रेस उमरान मलिकने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. मोहम्मद सिराजने 2 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर मोहम्मद शमी, हार्दिक पंड्या आणि युजवेंद्र चहल या तिकडीने प्रत्येकी 1 विकेट घेत उमरानला चांगली साथ दिली.
दरम्यान त्याआधी श्रीलंकेना टॉस जिंकून टीम इंडियाला बॅटिंगसाठी भाग पाडलं. टीम इंडियाने या संधीचं पू्र्ण फायदा घेतला. टीम इंडियाने श्रीलंकेला विजयासाठी 374 धावांचं लक्ष्य दिलं . टीम इंडियाने निर्धारित 50 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 373 धावा केल्या.
विराट व्यतिरिक्त टीम इंडियाकडून सलामीवीर आणि कर्णधार रोहित शर्माने 83 धावांची शानदार खेळी केली. शुबमन गिलने 70 रन्स केल्या. श्रेयस अय्यरने 28 धावांचं योगदान दिलं. केएल राहुलला चांगली सुरुवात मिळाली. मात्र तो 39 रन्स करुन मैदानाबाहेर गेला. हार्दिकने 14 रन्स केल्या. अक्षरने 9 धावा जोडल्या. तर मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज या दोघांनी अनुक्रमे नाबाद 4 आणि 7 धावा केल्या.
तर श्रीलंकेकडून कसून राजिथाने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर दिलशान मधुशंका, चामिका करुणारत्ने, दासून शनाका आणि धनांजया डी सिलिव्हा या चौकडीने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, उमरान मलिक, मोहम्मद सिराज आणि युझवेंद्र चहल.
श्रीलंका प्लेइंग इलेव्हन : दासुन शनाका (कर्णधार), पाथुम निसांका, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस (विकेटकीपर), धनंजया डी सिल्वा, चारिथ असलंका, वानिंदू हसरंगा, चमिका करुणारत्ने, दुनिथ वेललागे, कसून रजिथा आणि दिलशान मदुशंका.