भारत श्रीलंका यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका सुरु आहे. या मालिकेतील दोन सामने पार पडले असून श्रीलंकेने 1-0 ने आघाडी घेतली आहे. त्यामुळे तिसरा सामना भारतासाठी खूपच महत्त्वाचा आहे. हा सामना गमावला तर 27 वर्षानंतर श्रीलंकेविरुद्धची द्विपक्षीय मालिका गमावणार आहे. त्यामुळे तिसऱ्या सामन्यासाठी कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक गौतम गंभीर याने रणनिती आखली असणार यात शंका नाही. त्याची प्रचिती टॉस झाल्यानंतर आली. नाणेफेकीचा कौल श्रीलंकेच्या बाजूने लागला आणि श्रीलंकेचा कर्णधार चरीथ असलंका याने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कारण या खेळपट्टीवर 200 च्या पार धावा करणं कठीण आहे. मागच्या दोन सामन्यात याची अनुभूती आली आहे. त्यामुळे त्याने क्षणाचाही विलंब न करता फलंदाजीला प्राधान्य दिलं आहे. दुसरीकडे, कर्णधार रोहित शर्मा देखील नव्या प्लेइंग इलेव्हनसह मैदानात उतरला आहे. दोन जणांना रोहित शर्माने बेंचवर बसवलं असून ऋषभ पंत आणि रियान पराग यांना संधी दिली आहे. खेळपट्टी फिरकीला मदत करणारी असल्याने हा निर्णय घेतला आहे.
कर्णधार रोहित शर्माने सांगितलं की, ‘गेल्या दोन सामन्यांमध्ये आम्हाला आव्हान देण्यात आले आहे. आम्हाला फलंदाजी आणि गोलंदाजीत काय करावे लागेल हे स्पष्ट आहे. आम्ही त्याबाबत चर्चा केली आहे. आम्हाला एक संघ म्हणून काम करण्याची आवश्यकता आहे. याचे श्रेय तुम्हाला विरोधी संघाला द्यावे लागेल. ते चांगले खेळले आणि स्थिती चांगल्या प्रकारे समजून घेतली. आमच्यासाठी चुका दुरुस्त करण्याची आणखी एक संधी आहे. संघात दोन बदल केले आहेत. संघात केएल आणि अर्शदीपच्या जागी ऋषभ आणि रियान पराग आले आहेत.’
भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, रियान पराग, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज.
श्रीलंका (प्लेइंग इलेव्हन): पाथुम निसांका, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस (विकेटकीपर), सदीरा समरविक्रमा, चरिथ असालंका (कर्णधार), जेनिथ लियानागे, कामिंडू मेंडिस, दुनिथ वेललागे, महेश थेक्षाना, जेफ्री वेंडरसे, असिथा फर्नांडो