भारत आणि श्रीलंका यांच्या तीन सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील शेवटचा सामना 30 जुलै रोजी रंगणार आहे. हा सामना जिंकून श्रीलंकेला क्लिन स्वीप देण्याचा भारताचा प्रयत्न असेल. तर श्रीलंका शेवटचा सामना जिंकून मालिका 2-1 ने सोडवण्याच्या प्रयत्नात असेल. आता तिसऱ्या सामन्यात कोणत्या खेळाडूंना संधी मिळणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दुसऱ्या सामन्यात संजू सॅमसनला संधी मिळाली होती. पण शून्यावर बाद झाल्याने पुन्हा प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळेल की नाही याबाबत साशंकता आहे. पण शुबमन गिलला अजूनही बरं वाटत नसल्याने संधी मिळण्याची शक्यता वाढली आहे. संजू सॅमसनला संधी मिळाल्यानंतर त्याला चांगली कामगिरी करावीच लागणार आहे. कारण भारताचा पुढच्या वनडे मालिकेत त्याला स्थान मिळालेलं नाही. दुसरीकडे, भारताचा पुढचा टी20 सामना बांगलादेशसोबत आहे. तीन सामन्याची टी20 मालिका ऑक्टोबरमध्ये होणार आहे. त्यामुळे त्याला संघात स्थान मिळवण्यासाठी चांगली कामगिरी करावी लागेल.
दुसरीकडे, मोहम्मद सिराजची कामगिरी काही विशेष राहिली नाही. त्याने दोन सामन्यात फक्त एकच विकेट घेतली आहे. अशा परिस्थितीत त्याला तिसऱ्या सामन्यात आराम दिला जाऊ शकतो. त्याच्याऐवजी संघात खलील अहमदला संधी मिळू शकते. अक्षर पटेलची या सामन्यात चांगली कामगिरी राहिली आहे. जेव्हा संघाला आवश्यकता होती तेव्हा विकेट घेतली आहे. मात्र मालिका जिंकल्याने त्याच्या ऐवजी संघात वॉशिंग्टन सुंदरला संधी मिळू शकते. वॉशिंग्टन सुंदर हा अष्टपैलू खेळाडू असल्याने त्याच्याकडून तशाच अपेक्षा आहेत.
भारत संभाव्य प्लेइंग इलेव्हन: यशवी जयस्वाल, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव (कर्णधार), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रायन पराग, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, रवी बिश्नोई, खलील अहमद.
दुसरीकडे, 2 ऑक्टोबरपासून भारतीय संघ तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दृष्टीने ही मालिका खूपच महत्त्वाची ठरणार आहे. या मालिकेतून पुढच्या सहा महिन्यांसाठी काही खेळाडूंची पारख केली जाणार आहे. गौतम गंभीर आणि रोहित शर्मा ही जोडी पहिल्यांदाच एकत्र येणार आहे. यापूर्वी हे दोघंही 2007 टी20 वर्ल्डकप संघात एकत्र खेळले होते.