चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी तयारी करताना टी20 वर्ल्डकप विजयाची झिंग काही उतरलेली दिसत नाही. श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेत याची प्रचिती येताना दिसत आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाला होणाऱ्या धावा करणंही कठीण झालं आहे. सलग दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाला श्रीलंकेने कोंडीत पकडलं. त्यामुळे ताकही फुंकून पिण्याची वेळ आली आहे. पहिला सामना फक्त एका धावेने जिंकता आला नाही. तर दुसऱ्या सामन्यात 32 धावांनी पराभूत व्हावं लागलं. खरं तर दोन्ही सामन्यात रोहित शर्माने चांगली सुरुवात करून दिली होती. पण मधली फळी एकदम कमकुवत निघाल्याचं दिसत आहे. त्यामुळे क्रीडाप्रेमींना आतापासून चिंता वाटू लागली आहे. असं असताना पहिल्या दोन सामन्यात एकाच प्लेइंग इलेव्हनसह रोहित शर्मा मैदानात उतरला होता. यात आता बदल होण्याची दाट शक्यता आहे. कोणाचा पत्ता कापला जाणार आणि कोणाला संधी मिळू शकते ते जाणून घेऊयात.
टीम इंडियाच्या टॉप ऑर्डरमध्ये एकही डावखुरा फलंदाज नसल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे पहिल्या सामन्यात वॉशिंग्टन सुंदरला आणि दुसऱ्या सामन्यात शिवम दुबेला चौथ्या स्थानावर फलंदाजीसाठी पाठवलं गेलं. त्यामुळे श्रेयस अय्यर आणि केएल राहुल यांना नंतर फलंदाजीसाठी यावं लागलं. कारण दोघही राइट हँडेड फलंदाज आहेत. वॉशिंग्टन सुंदरने 5 आणि शिवम दुबेला चौथ्या स्थानावर आपलं खातंही खोलता आलं नाही. वॉशिंग्टन सुंदर आणि शिवम दुबे चौथ्या क्रमांकावर तितक्या क्षमतेने फलंदाजी करू शकतात का? असा प्रश्न क्रीडाप्रेमींना पडला आहे. अशा स्थितीत प्लेइंग इलेव्हनमध्ये ऋषभ पंतला संधी मिळू शकते. कारण त्याला चौथ्या क्रमांकावर खेळण्याचा चांगला अनुभव आहे.
ऋषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये घेतलं तर कोणाचा पत्ता कापला जाणार हा प्रश्न आहे. विकेटकीपरचा विचार केला तर केएल राहुल बाहेर होईल. पण श्रेयस अय्यरचा फॉर्म पाहता त्यालाही बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो. त्यामुळे रोहित शर्मा चौथ्या वनडे सामन्यात कठोर होत योग्य तो निर्णय घेईलच. पण या दोघांपैकी एकाचा पत्ता कापला जाण्याची दाट शक्यता आहे. ऋषभ पंतकडे मॅच विनर खेळाडू म्हणून पाहिलं जातं. त्यामुळे 7 ऑगस्ट प्लेइंग इलेव्हन कशी असेल याबाबत उत्सुकता आहे.