भारत आणि श्रीलंका यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात कर्णधार रोहित शर्माचा झंझावात पाहायला मिळाला. श्रीलंकेच्या गोलंदाजांवर तुटून पडला. खेळपट्टी फिरकीला मदत करणारी असून रोहित शर्माने अनुभवाच्या जोरावर खेळी केली. इतकंच काय पहिल्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर षटकार मारून आपला हेतूही स्पष्ट केला. रोहित शर्माने 33 चेंडूत 53 धावांची खेळी केली. तसेच पहिल्या 10 षटकात अर्धशतक झळकावण्याची ही त्याची तिसरी वेळ आहे. रोहित शर्माने आपल्या अर्धशतकी खेळीदरम्यान तीन षटकार ठोकला आणि त्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. रोहित शर्माने कर्णधार म्हणून 234 षटकारांचा टप्पा गाठला आहे. त्याने इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गनला मागे टाकत आता पहिलं स्थान पटकावलं आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये यापूर्वी इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गनच्या नावावर सर्वाधिक षटकारांची नोंद होती. त्याच्या नावावर 233 षटकार होते. कर्णधार रोहित शर्माने श्रीलंकेविरुद्ध 3 षटकार मारताच हा विक्रम आता त्याच्या नावावर झाला आहे. रोहित शर्माच्या नावावर आता 234 षटकार झाले आहेत. रोहित शर्माने आतापर्यंत 124 आंतरराष्ट्रीय सामन्यात कर्णधारपद भूषवलं आहे. यात कसोटीत त्याने 21, वनडेत 108 आणि टी20 क्रिकेटमध्ये 105 षटकार मारले आहेत. तिसऱ्या स्थानावर महेंद्रसिंह धोनी असून त्याच्या नावावर 211 षटकार आहेत. चौथ्या स्थानावर रिकी पाँटिंग असून त्याच्या नावावर 171 आणि ब्रँडन मॅक्युलमच्या नावावर 170 षटकार आहेत.
रोहित शर्माने वनडे कारकिर्दिची सुरुवात 2007 साली केली होती. आतापर्यंत रोहित शर्मा 263 वनडे सामने खेळला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या 58 धावा पकडल्या तर त्याने आतापर्यंत 10767 धावा केल्या आहेत. यात 31 शतकांचा समावेश आहे. दरम्यान, श्रीलंकेने भारतासमोर 50 षटकात विजयासाठी 230 धावांचं आव्हान ठेवलं आहे.
श्रीलंका (प्लेइंग इलेव्हन): पथुम निसांका, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस (विकेटकीपर), सदीरा समरविक्रमा, चारिथ असालंका (कर्णधार), जेनिथ लियानागे, वानिंदू हसरंगा, दुनिथ वेललागे, अकिला दानंजया, असिथा फर्नांडो, मोहम्मद शिराज.
भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज.