IND vs SL : रोहित आणि विराटची गरज होती का? आशिष नेहरा गंभीरच्या रणनितीवर टीका करत म्हणाला..

| Updated on: Aug 05, 2024 | 10:00 PM

माजी वेगवान गोलंदाज आणि गुजरात टायटन्सचा प्रशिक्षक आशिष नेहराने गौतम गंभीरच्या रणनितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. या मालिकेत रोहित शर्मा आणि विराट कोहलीऐवजी अन्य खेळाडूंना संधी देण्याची गरज होती असं स्पष्टपणे सांगितलं आहे. आता तिसऱ्या सामन्यात पराभव झाला तर यावर आणखी गंभीर चर्चा होऊ शकते.

IND vs SL : रोहित आणि विराटची गरज होती का? आशिष नेहरा गंभीरच्या रणनितीवर टीका करत म्हणाला..
Follow us on

वनडे मालिकेत श्रीलंकेने भारताला विजयासाठी चांगलंच झुंजवलं. जिंकणाऱ्या सामन्यात पराभवाची धूळ चारली. त्यामुळे आता भारतीय संघाची रणनिती रडारवर आली आहे. खरं तर दोन सामन्यात परीक्षण करणं चुकीचं आहे. पण दिग्गज खेळाडूंचा भरणा असताना अशा पद्धतीने पराभव होणं खूपच वाईट आहे. त्यामुळे काही जण दबक्या, तर काही जण थेट रणनितीवर बोट ठेवू लागले आहे. आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सचा प्रशिक्षक असलेल्या आशिष नेहराने गौतम गंभीरच्या रणनितीवर आक्षेप घेतला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेत कर्णधार रोहित शर्मा आणि अनुभवी फलंदाज विराट कोहलीला खेळवण्याची गरज नव्हती, असं मत आशिष नेहराने व्यक्त केलं आहे. या मालिकेत युवा खेळाडूंना संधी देणं गरजेचं होतं. तसेच या दोन्ही दिग्गज खेळाडूंना आराम द्यायला हवा होता, असं मतही त्याने पुढे मांडलं.

“मला माहिती आहे की गौतम गंभीर प्रशिक्षक म्हणून नवखा आहे. तो अनुभवी खेळाडूंसोबत काही काळ घालवू इच्छित आहे. या मालिकेसाठी विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना आराम द्यायला हवा होता असं माझं मत आहे. दोन्ही खेळाडूंच्या जागी अन्य खेळाडूंना संधी देता आली असती.” असं आशिष नेहराने सांगितलं. “गौतम गंभीर काय विदेशी कोच नाही की रोहित शर्मा आणि विराट कोहलीसोबत योग्य घडी बसवू इच्छितो. या दोन्ही वरिष्ठ खेळाडूंच्या जागी युवा खेळाडूंना संधी मिळायला हवी होती.” असंही आशिष नेहराने पुढे सांगितलं.

वनडे मालिकेतील दोन्ही सामन्यात भारतीय संघ सहज जिंकेल असं वाटत होतं. पण दोन्ही वेळेस अंदाज चुकला. पहिला सामना बरोबरीत सुटला असला तरी भारतीय संघ विजयाच्या दारात होता. दुसऱ्या सामन्यात कर्णधार रोहित शर्माने चांगली सुरुवात करून दिली. तरी भारतीय संघातील मधली फळी कमकुवत ठरली आणि पराभव झाला. रोहित शर्माने पहिल्या वनडे 47 चेंडूत 58, दुसऱ्या वनडेत 44 चेंडूत 64 धावा केल्या. तर विराट कोहलीने पहिल्या सामन्यात 24 धावा आणि दुसऱ्या सामन्यात 14 धावा केल्या.