भारत श्रीलंका यांच्यात तिसरा टी20 सामना सुरु आहे. हा सामना जिंकून श्रीलंकेला व्हाईटवॉश देण्याची संधी भारताकडे आहे. भारताने तीन सामन्यांची टी20 मालिका आधीच 2-0 ने जिंकली आहे. त्यामुळे तिसरा सामना औपचारिक असल्याने भारतीय संघात चार बदल करण्यात आले आहेत. या सामन्यात बेंचवर बसलेले खेळाडू चांगली कामगिरी करतील अशी अपेक्षा आहे. दुसरीकडे, संजू सॅमसनला दुसऱ्या सामन्यात संधी मिळूनही सोनं करू शकला नाही. त्याला संघात घेतलं नाही की गदारोळ आणि घेतलं की फेल असे काही द्विधा मनस्थितीत आता त्याचे चाहते आहेत. दुसऱ्या टी20 सामन्यात शुबमन गिलला दुखापत झाल्याने संधी मिळाली होती. पण तेव्हा गोल्डन डकवर बाद झाला होता. आता त्याला पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. खरं तर संजू सॅमसनसाठी ही शेवटची संधी होती अशी क्रीडाप्रेमींमध्ये दबक्या आवाजात चर्चा आहे. कारण प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवणं संजू सॅमसनला कठीण झालं आहे. त्यामुळे संघातील स्थान अबाधित ठेवण्यासाठी मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र संजू सॅमसन त्यातही फेल ठरला आहे. संजू सॅमसनला तिसऱ्या सामन्यात ओपनिंग करण्याची संधी मिळाली नाही. पण यशस्वी जयस्वाल बाद होताच त्याचं प्रमोशन झालं होतं.
तिसऱ्या स्थानावर आल्यानंतर बरीच षटकं शिल्लक होती आणि मोठी धावसंख्या करण्यासही संधी होती. पण त्या संधीचं सोनं करता आलं नाही. चार चेंडू खेळल्यानंतर त्याला भोपळा फोडता आला नाही. चमिंडू विक्रमासिंगच्या गोलंदाजीवर हसरंगाने त्याचा झेल पकडला. त्यामुळे सलग दुसऱ्यांचा शून्यावर बाद झाला आहे. संजू सॅमसनने या नकोशा खेळीसह नको त्या पंगतीत बसला आहे. टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तीन वेळा शून्यावर बाद होणारा भारतीय खेळाडू ठरला आहे. यापूर्वी श्रेयस अय्यर आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी ही नकोशी कामगिरी केली आहे. तर रोहित शर्मा पाचवेळा शून्यावर बाद झाला आहे.
भारत (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, रियान पराग, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, मोहम्मद सिराज, खलील अहमद.
श्रीलंका (प्लेइंग इलेव्हन): पाथुम निसांका, कुसल मेंडिस (विकेटकीपर), कुसल परेरा, कामिंदू मेंडिस, चरित असलंका (कर्णधार), चामिंडू विक्रमसिंघे, वानिंदू हसरंगा, रमेश मेंडिस, महेश थीक्षाना, मथीशा पाथिराना, असिथा फर्नांडो.