मुंबई | टीम इंडियाचा आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मधील आतापर्यंतचा प्रवास शानदार राहिला आहे. टीम इंडियाने सहाच्या सहा सामने जिंकेल आहेत. टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश, न्यूझीलंड आणि इंग्लंडचा धुव्वा उडवला आहे. टीम इंडियाचा आता पुढेही अशीच विजयी घोडदौड कायम राखण्याचा प्रयत्न असणार आहे. टीम इंडियाचा वर्ल्ड कपमधील सातवा सामना हा 2 गुरुवारी नोव्हेंबरला पार पडणार आहे. या सामन्यात टीम इंडियासमोर श्रीलंकेचं आव्हान आहे.
टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका यांच्यातील सामना हा मुंबईतील ऐतिहासिक वानखेडे स्टेडियममध्ये पार पडणार आहे. टीम इंडियाने 12 वर्षांपूर्वी 2011 साली याच मैदानात श्रीलंकेला पराभूत करत 28 वर्षांनंतर महेंद्र सिंह धोनी याच्या नेतृत्वात वर्ल्ड कप जिंकला होता. आता टीम इंडियाचं लक्ष हे श्रीलंका विरुद्ध वर्ल्ड कपमध्ये विजयी हॅटट्रिक मिळवण्याकडे आहे. टीम इंडिया 2011 आणि 2019 मध्ये विजयी ठरली होती.
दोन्ही संघ वनडे वर्ल्ड कप इतिहासात आतापर्यंत एकूण 9 वेळा आमनेसामने आले आहेत. यामध्ये टीम इंडिया आणि श्रीलंका दोन्ही संघ तुल्यबल राहिले आहेत. दोन्ही संघांनी प्रत्येकी 4-4 सामने जिंकले आहेत. तर 1 सामन्याचा निकाल लागला नाही. श्रीलंकाने 1979, 1996 मध्ये 2 वेळा आणि 2007 मध्ये टीम इंडियावर विजय मिळवला होता. तर त्यानंतर टीम इंडियाने सलग 1999, 2003, 2011 आणि 2019 मध्ये विजय मिळवला. तर 2015 दोन्ही संघांचा सामना झाला नाही.
दरम्यान टीम इंडिया पॉइंट्स टेबलमध्ये 6 विजय आणि 12 पॉइंट्ससह दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर श्रीलंकेला 6 पैकी फक्त 2 सामन्यातच जिंकता आलंय. श्रीलंकेने नेदरलँड्स आणि इंग्लंडला पराभवाची धूळ चारली आहे. त्यामुळे आता 2 नोव्हेंबरला होणाऱ्या सामन्यात कोणती टीम मैदान मारते, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
आयसीसी वनडे वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर आणि इशान किशन.
वनडे वर्ल्ड कपसाठी श्रीलंका टीम | कुसल मेंडिस (कॅप्टन आणि विकेटकीपर), पथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, सदीरा समरविक्रमा, चारिथ असलंका, धनंजया डी सिल्वा, अँजेलो मॅथ्यूज, महेश तीक्षना, कसून रजिथा, दुष्मंथा चमीरा, दिलशान मदुशंका, चमिका करुणारत्ने, दुनिथ वेललागे, दुशन हेमंथा आणि कुसल परेरा.