मुंबई | आयसीसी वर्ल्ड कप 2023 मधील 33 व्या सामन्यात टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका आमनेसामने होते. टीम इंडियाने या 33 व्या सामन्यात श्रीलंकावर 302 धावांनी विजय मिळवला. भारतीय संघांने श्रीलंकेला 358 धावांचं आव्हान दिलं होतं. या 358 धावांच्या आव्हानाचं पाठलाग करताना भारतीय संघाने श्रीलंकेला 55 धावांमध्ये गुंडाळलं. टीम इंडियाचा हा सलग सातवा विजय ठरला. टीम इंडिया या विजयासह सेमी फायनलमध्ये पोहचली. टीम इंडिया आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 सेमी फायनलमध्ये पोहचणारी पहिली टीम ठरली. टीम इंडियाने या विजयासह पॉइंट्स टेबलमध्ये दक्षिण आफ्रिकाला पछाडत अव्वल स्थानी झेप घेतली. मात्र त्यानंतरही टीम इंडिया दक्षिण आफ्रिकाच्या तुलनेत एकाबाबत मागेच राहिली आहे.
टीम इंडियाने सातव्या विजयासह पॉइंट्स टेबलमध्ये 14 गुणांसह अव्वल स्थानी आहेत. टीम इंडियाचा नेट रनरेट हा आता प्लस +2.102 असा आहे. टीम इंडियाचा श्रीलंका विरुद्धच्या विजयाआधी हा रनरेट +1.405 इतका होता. तर दक्षिण आफ्रिकाचा नेट रनरेट हा टीम इंडियापेक्षा सरस आहे. दक्षिण आफ्रिकाचा नेट रनरेट +2.290 इतका आहे. थोडक्यात काय तर मोठ्या फरकाने जिंकूनही टीम इंडियाचा नेट रनरेट हा दक्षिण आफ्रिकाच्या तुलनेत कमीच आहे.
शुबमन गिल 92, विराट कोहली 88 आणि श्रेयस अय्यर याने 82 धावांचं योगदान दिलं. तर अखेरीस रविंद्र जडेजा याने 35 धावा जोडल्या. टीम इंडियाने या जोरावर 50 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 357 धावांपर्यंत मजल मारली. त्यामुळे श्रीलंकासमोर टीम इंडियाने 358 धावांचं आव्हान ठेवलं. मात्र विजयासाठी उतरलेली श्रीलंका टीम इंडियाच्या गोलंदाजांसमोर आशिया कप फायनलप्रमाणे फुस्स ठरली.
टीम इंडियाच्या गोलंदाजांनी श्रीलंकाला 19.4 ओव्हरमध्ये 55 धावांवर गुंडाळलं. टीम इंडियाकडून मोहम्मद शमी याने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. तर मोहम्मद सिराज याने 3 जणांना आऊट केलं. तर जसप्रीत बुमराह आणि रविंद्र जडेजा या दोघांनी 1-1 विकेट घेतली.
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज.
श्रीलंका प्लेईंग ईलेव्हन | कुसल मेंडिस (कॅप्टन आणि विकेटकीपर), पाथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, सदीरा समरविक्रमा, चारिथ असलंका, अँजेलो मॅथ्यूज, दुशान हेमंथा, महेश तीक्षना, कसुन रजिथा, दुष्मंथा चमीरा आणि दिलशान मदुशंका.