मुंबई : एक जागा आणि 3 खेळाडू असं चित्र कर्णधारासमोर असेल तर. झाली ना गोची. इथे कुणाला टाळलं तर त्यावर अन्यायही व्हायला नको, अशी भावना असते. तर चांगल्या खेळाडूला संधी देण्याचंही तितकंच जबाबदारीचं काम असतं. भारतीय संघाला 22 जुलैपासून वेस्ट इंडिजविरुद्ध 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळायची आहे (IND vs WI ODI). अशा परिस्थितीत प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांना सलामीसाठी थोडी मेहनत करावी लागेल कारण रांगेत एक जागा आणि 3 खेळाडू आहेत. या मालिकेत शिखर धवन (Shikhar Dhawan) कर्णधारपदाची धुरा सांभाळेल आणि साहजिकच तो भारतीय संघाच्या डावाची सुरुवात करेल. नियमित कर्णधार रोहित शर्माला वेस्ट इंडिजविरुद्धच्या आगामी वनडे मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे. शिखर धवन कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळेल आणि सलामीही करेल. त्याच्याशिवाय टीममध्ये आणखी तीन सलामीवीर आहेत – ईशान किशन , ऋतुराज गायकवाड आणि शुभमन गिल . अशा स्थितीत दुसरा सलामीवीर निवडताना धवन आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांना काही विचारमंथन करावे लागेल.
भारतीय संघ डाव्या आणि उजव्या हातांचे संयोजन करतो. रोहित शर्मा उजव्या हाताने सलामीवीर आहे, तर डावखुरा शिखर धवन इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत त्याच्यासोबत मैदानात उतरला आहे. आता उजव्या हाताचा सलामीवीर शुभमन धवनसोबत उतरू शकतो. 3 एकदिवसीय सामन्यांव्यतिरिक्त पंजाबच्या या क्रिकेटपटूने 11 कसोटी सामनेही खेळले आहेत आणि 4 अर्धशतकेही झळकावली आहेत.