मुंबई : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका सुरु आहे. पहिला वनडे सामना जिंकत भारताने मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. वनडे वर्ल्डकपपूर्वी ही मालिका भारतासाठी महत्त्वाची आहे. या मालिकेतून वनडे संघासाठी खेळाडूंची निवड करणं सोपं होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर टीम इंडियामध्ये काही बदल केले जात आहेत. असं असताना आता दुसऱ्या वनडेत काही धक्कादायक बदल टीम इंडियात पाहायला मिळाले. दिग्गज खेळाडू विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना आराम देण्यात आला आहे. तर टीम इंडियाचं नेतृत्व हार्दिक पांड्याकडे सोपण्यात आले.
टीम इंडियामध्ये विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या जागी अक्षर पटेल आणि संजू सॅमसन यांना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे आश्चर्याचा धक्का बसला आहे. कोण कोणत्या स्थानावर खेळणार याबाबत क्रीडाप्रेमींमध्ये चर्चा रंगली आहे. दरम्यान नाणेफेकीचा कौल जिंकत वेस्ट इंडिज संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या मैदानावर गोलंदाजांचं वर्चस्व दिसून आलं आहे. त्यामुळे भारतीय फलंदाजांची कसोटी लागणार आहे.
आम्हालाही पहिल्यांदा फलंदाजीच करायची होती. आम्ही यावर कशा धावा करतो ते पाहायचं आहे. रोहित आणि विराट सातत्याने क्रिकेट खेळत आहेत. आम्हाला काही प्रश्नांची उत्तरं मिळणं गरजेचं आहे आणि त्यासाठी त्यांना विश्रांती दिली आहे. तिसऱ्या वनडेसाठी ते पुन्हा मैदानात उतरतील. गोलंदाजांनी पहिल्या वनडेत 115 धावांवर रोखलं होतं. गोलंदाजांचा चांगला प्रयत्न होता. आता आम्ही वेगळ्या क्षेत्रात सुधारणा करू इच्छित आहोत. पाच ऐवजी आम्ही दोन गडी गमवून हा सामना जिंकू शकलो असतो. रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या जागेवर संजू सॅमसन आणि अक्षर पटेल यांना संधी दिली आहे.
वेस्ट इंडीज (प्लेइंग इलेव्हन): ब्रँडन किंग, काइल मेयर्स, अॅलिक अथनाझे, शाई होप (विकेटकीपर, कर्णधार), शिम्रॉन हेटमायर, केसी कार्टी, रोमॅरियो शेफर्ड, यानिक कॅरिया, गुडाकेश मोटी, अल्झारी जोसेफ, जेडेन सील्स
भारत (प्लेइंग इलेव्हन): शुभमन गिल, इशान किशन (विकेटकीपर), संजू सॅमसन, हार्दिक पांड्या (कर्णधार), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, उमरान मलिक, मुकेश कुमार